शालेय पोषण आहाराच्या फोडणीसाठी दीड कोटी!

खाद्यतेल,भाजीपाल्याची भेडसावणारी चिंता मिटली
शालेय पोषण आहाराच्या फोडणीसाठी दीड कोटी!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शालेय पोषण आहारासाठी (School nutrition diet) मे महिन्यात शाळांमध्ये (schools) धान्यादिक (Supply of foodgrains) मालाचा पुरवठा करण्यात आला. मात्र, खाद्यतेल आणि भाजीपाला खरेदीची (Buy edible oils and vegetables) चिंता सतावत होती. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, आता शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी जून आणि जुलै महिन्यासाठी 1 कोटी 73 लाख 33 हजार 172 रुपयांचे अग्रीम मंजूर (Advance approved) केले आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी या अग्रीम अनुदान मंजुरीचा प्रस्ताव सीईओंकडे सादर करण्यात येणार असून लवकरच मुख्याध्यापकांच्या खात्यात विद्यार्थी संख्येनुसार अनुदान वर्ग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना भेडसावणारी खाद्यतेल,भाजीपाला खरेदीचीही चिंता मिटली. शासनाकडून मिळालेला निधी हा चेक स्वरुपात शाळांकडे वर्ग केला जात होता. मात्र, ही प्रणाली बंद झाली असून, पीएफएमएस पध्दती लागू केली आहे.

शाळांना मिळणार अग्रीम अनुदान

जळगाव जिल्ह्यात 2 हजार 751 शाळा असून पहिली ते पाचवीचे 2 लाख 51 हजार 772 विद्यार्थी आहेत. 0.79पैसे प्रति विद्यार्थीप्रमाणे गणना करुन अग्रीम अनुदान मंजूर केले आहे. तर सहावी ते आठवीचे 1 लाख 98 हजार 669 विद्यार्थी पात्र असून त्यांची 1.18 रुपये प्रमाणे गणना करुन अनुदान शाळा स्तरावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुख्याध्यापकांच्या खात्यावर आठवडाभरात वर्ग होणार निधी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळे शिजवलेला पोषण आहार वाटप योजनेला बे्रक लागला होता. त्यानंतर कोरडा पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यावर भर दिला होता. मात्र, काही ठिकाणी पोषण आहार पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत होत्या आणि विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित रहात होते. त्यानंतर पोषण आहाराच्या मालाचा पुरवठा करण्यावरून सुरू झालेल्या न्यायालयीन लढ्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित होते. येत्या शैक्षणिक वर्षासाठी मे, जून महिन्यातच धान्यादिक मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात आला.

मात्र या वर्षाच्या धान्यपुरवठा करारनाम्यात खाद्यतेलाचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्याने इंधन आणि भाजीपालाबाबतही निधीची कमतरता भासत होती. यामुळे धान्य मिळाले तरी खाद्यतेल, इंधन आणि भाजीपाला खरेदीची चिंता कायम होती. याकरिता मुख्याध्यापक, शिक्षकांना तजवीज करावी लागत होती.

काही ठिकाणी क्रेडिटवर हे साहित्य खरेदी करावे लागत होते. अखेर शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी 1 कोटी 73 लाख 33 हजार 172 रुपयांचे अग्रीम मंजूर केले. प्राप्त झालेल्या या अनुदानाची रक्कम पीएफएमएस सिस्टिमद्वारे शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. हे अनुदान फक्त जून आणि जुलै महिन्यासाठी आहे. यामुळे आता शाळा आणि मुख्याध्यापकांसह शिक्षकांची चिंता कमी झाली आहे.

जि.प. सीईओंकडे प्रस्ताव रवाना

खाद्यतेल आणि भाजीपालासाठी शासनाकडून जून आणि जुलै महिन्यासाठी 1 कोटी 73 लाख 33 हजार 172रुपयांंचे अग्रीम अनुदान मंजूर झालेले असून त्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार करुन जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे रवाना करण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात आत शाळा मुख्याध्यापकांच्या खात्यात सदरची रक्कम वर्ग होईल.तसेच 25 विद्यार्थ्यांमागे 1 मदतनिस तर 26 ते 99 विद्यार्थ्यांमागे दोन मदतनिस असून 100 ते 500 विद्यार्थ्यांमागे 5 ते 6 मदतनिस व स्वयंपाकी शाळास्तरावर अन्न शिजवून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी कार्यरत आहेत.

शालेय पोषण आहाराच्या फोडणी तेलाकरिता शासनाकडून 1 कोटी 73 लाख 33 हजार 172रुपयांंचे अग्रीम अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार आता रुजकर बनणार आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि मुख्याध्यापकांना भेडसावणारी चिंता मिटली आहे.

विकास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com