
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्हाभरात जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत 1400पेक्षा अधिक गावांना 1 हजार 342 योजना देण्यात आल्या आहे. त्या कामांचे कार्यादेश देवून 3 ते 5 महिने उलटले तरी कामे सुरू करण्यात आली नसल्याच्या तक्रारी येत असल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शुक्रवारी 170 ठेकेदारांना (contractors) नोटिसा (Notices) बजावल्या आहे. वेळेत कामे सुरू करा,अन्यथा 15 दिवसात कामे सुरू न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत ठेकेदारांना 5 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी दिला आहे.
केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 478 योजना मंजूर करण्यात आल्या असून या कामांना प्रशासकीय मान्यता देवून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. बर्याच योजनांना 8 ऑगष्ट व त्यानंतर वर्क ऑर्डर देण्यात आल्या असल्या तरी पाच महिन्यात ठेकेदारांनी कामाला सुरुवातदेखील केलेली नाही.
कामे वेळेत सुरु न केल्याने जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी आज ठेकेदारांना पहिलीच नोटीस देवून दणका दिला आहे. जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे. त्यांना 15 दिवसात योजनेचे काम किती प्रगतीत आहे, हे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
बार चार्टनुसार प्रगती न झालेल्या योजनांच्या ठेकेदारांना 15 दिवसानंतर दुसरी नोटीस दंडात्मक पध्दतीने दिली जाणार असून ठेकेदाराला नोटीस मिळाल्यापासून 5 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश श्री. भोगावडे यांनी दिले आहे.