दलित वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला मज्जाव

निपाणे येथील घटना ; माजी जि.प.सदस्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दलित वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला मज्जाव

पाचोरा / नगरदेवळा । प्रतिनिधी/ वार्ताहर

तालूक्यातील निपाणे येथे दलित समाजातील वृध्द महिलेच्या प्रेतावर अंत्यंसंस्कार करण्यास मज्जाव करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह 11 जणांवर अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती कायद्याअंतर्गत पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांच्या माहीतीनुसार समाधान वामन धनुर्धर हे निपाणे येथिल रहीवाशी असुन त्यांची आई निलाबाई वामन धनुर्धर (वय 67) या सुरत येथे मुलीकडे गेल्या होत्या. त्यांचे दि.11 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता सुरत येथे वृध्दापकाळाने निधन झाले. सर्व नातेवाईक इकडेच असल्याने आईचा अंत्यसंस्कार निपाणे येथे करण्यासाठी मृतदेह 12 सप्टेंबरला निपाणे आणला गेला. अंत्यविधीचा वेळ रात्री 10.30 वाजता ठरले होते.

गावासह परिसरात पावसाने जोर धरला होता. अशा पावसात गावातील जिल्हा परिषदेने बांधुन दिलेल्या नविन स्मशानभुमित अंत्यंसंस्कार करण्याचे ठरल्याने तेथे रात्री अंत्यवीधीसाठी गेल्यावर सरण रचत असतांना माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटिल, रोशन पाटिल, राजेंद्र पाटिल, त्र्यंबक पाटील, भैय्या पाटील यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. रोशन पाटिल यांनी ही स्मशानभुमी महारांची नसुन मराठ्यांची आहे, तर मनोहर पाटिल यांनी माझे समाजाला ही स्मशानभुमी जिल्हा परिषदेने मराठा समाजासाठी बांधलेली आहे. तुम्ही नेहमी प्रमाणे गावकुसाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत तुमच्या आईला जाळा. इकडे आम्ही प्रेत जाळु देणार नाही. विनाकारण वाद घालु नकाल असे बोलले.

मनोहर पाटिल यांचे सोबत आलेले राजेंद्र पाटिल, ञ्यंबक पाटिल, रोशन पाटिल, मयुर पाटिल, गोकुळ पाटिल, निलेश पाटिल, शांताराम पाटिल यांनी येवून सांगितले की, आमच्या मराठा समाजाच्या स्मशानभुमितुन प्रेत उचलून घेउन जा, नाहीतर तुमचेही या मुर्द्यासोबत मुर्दे पाडु अशी धमकी दिली. सकाळी ही स्मशानभुमी गोमुत्राने धुवून काढा. यावेळी समाधान धनुर्धर यांच्यासोबत नातेवाईकांनी त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीएक ऐकले नाही व धक्काबुक्की केली. वाद विकोपाला जावू नये म्हणुन समाधान धनुर्धर यांनी व दलित बांधवांनी स्मशानभुमीच्या बाहेर मोकळ्या जागेत रात्री 12.30 ला अंत्यसंस्काराचा विधी केला. आईचा धार्मिक विधी पार पाडल्यानंतर समाधान धनुर्धर यांनी बुधवारी पाचोरा पोलिसात त्यांच्या नातेवाईकांसह येवून मनोहर पाटिल व त्यांच्या सोबतच्या 10 जणांवर भाग 5 गुरनं. 422 भादवी 143, 147, 297, 323, 504, 506, अनुसूचीत जाती आणी जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 चे कलम 3(1)(ड),3(1)(पाच),3(1)(न), 3(2)(त-) प्रमाणे गुन्हा नोंदविला असुन पुढिल तपास करीत आहेत.

आज विरोधी पक्षनेत्यांना भेटणार

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पाचोरा येथे नियोजित दौर्‍यावर येणार असल्याने याप्रकरणी स्थानिक राजकिय दबाव येवू नये व दलित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com