मतीमंद ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधामाला १४ वर्ष कारावास

जळगाव जिल्हा न्यायालयात निकाल ; इशार्‍यावर मुलीकडून घटना कथन, मुख्याध्यापकांनी केले भाषांतर
मतीमंद ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधामाला १४ वर्ष कारावास

जळगाव ( Jalgaon) -

झोपत असलेल्या ९ वर्षीय मतीमंद मुलीला उचलून शेतात नेत तिच्यावर मद्याच्या नशेत लैंगिक अत्याचार करणार्‍या अर्जुन अशोक पाटील (वय ३२) या आरोपीला न्यायालयाने १४ वर्ष कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बुधवारी जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी हा निकाल दिला.

तालुक्यातील एका गावात २० फेब्रुवारी रोजी ९ वर्षीय गतीमंद मुलगी आईसोबत झोपली असतांना, रात्री ११ वाजता मद्याच्या नशेत तर्रर अर्जून पाटील हा आला. त्याने झोपडीतून मुलीला उचलून ५०० मीटर अंतरावरील एका गव्हाच्या शेतात नेले. व मुलीवर लैंगिंक अत्याचार केला. रात्री १ वाजता पीडितेची आई उठली असता मुलगी जागेवर दिसली नाही, म्हणून त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. पहाटे पाच वाजता ती शेतात विवस्त्र अवस्थेत मिळून आली होती. घटनास्थळावरुन पळून जाणार्‍या संशयिताला मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग करुन पकडले होते. व तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयात न्या. डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होवून हा खटला चालला. १७ जणांची साक्ष घेण्यात आली. सहायक सरकारी अभियोक्ता नीलेश चौधरी यांनी माणसुकीला काळीमा फासणार्‍या या घटनेवर प्रभावी युक्तीवाद केला. पीडिता मतीमंद असल्याने तिने मतीमंद शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर जशीच्या तशी घटना कथन केली.

मुख्याध्यापकांनी या इशार्‍याचे रुपांतर बोली भाषेत करुन घटना न्यायालयाला मांडली. इतर साक्षीदार, पुरावे तसेच सरकारी वकील ऍड. निलेश चौधरी यांचा युक्तीवादाअंती न्या. खडसे यांनी प्रत्येक कलमात आरोपी अर्जुन पाटील यास दोषी धरुन शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून देविदास कोळी व धर्मेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.