माझ्या पप्पांचा पगार खूपच कमी आहे. घरी खायला सुध्दा नाहीये

एस.टी. कामगारांच्या परिवाराचा आंदोलनात शासनाला सवाल
माझ्या पप्पांचा पगार खूपच कमी आहे. घरी खायला सुध्दा नाहीये

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बस आगारात एस टी कर्मचार्‍यांच्या (ST employees) आंदोलनाचा (Movement) आज सातवा दिवस आहे. या आंदोलनादरम्यान शनिवारी जळगाव आगारात (Jalgaon depot) बस कामगारांचे चिमुकल्यांसह परिवार आंदोलनात (Families of bus workers) सहभागी झाला. कामगाराच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी करत आंदोलनात सहभागी कामगारांच्या परिवाराने प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्या मान्य कराव्या असे साकडेही प्रशासनाला कामगारांच्या वतीने घातले आहे.

एसटी विभागाला राज्य शासनात विलीन करावे यासह विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे सर्व एसटीची वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांवर प्रशासनाकडून कारवाई सुध्दा करण्यात येत आहे. या कारवाईचा निषेध करण्यासह कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी शनिवारी जळगाव बसआगारात आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलनात सहभागी प्रत्येक बस कामगाराची पत्नी व चिमुकल्यांसह संपूर्ण परिवाराने बसस्थानकात ठिय्या मांडला.

घोषणांनी परिसर दणाणला

एस.टी. कर्मचार्‍यांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, राज्यशासनात विलिनीकरण झालेच पाहिजे, कामगार एकजुटीचा विजय असो, कोण म्हणत देणार नाही, घेतल्या शिवाय राहणा नाही...हब सब एक है अशा आंदोलनात सहभागी कामगाराच्या परिवारातील महिलांसह चिमुकल्यांनी दिलेल्या जोरदार घोषणाबाजीने बसस्थानक परिसर दणाणला होता. यावेळी चिमुकल्यासह महिलांनी लक्ष वेधले होेते. तोडक्या पगारात संसार कसा भागवयाचा? अगदी तोकड्या पगारात एसटीचा कर्मचारी काम करतो त्यामुळे घर कसे चालवावे हा नेहमीचा प्रश्न आहे. कमी पगारामुळे उदरनिर्वाह भागवित असतांना एस.टी.कामगाराला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मात्र असे असतांनाही तो अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावून कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराच्या अशी आर्त हाक यावेळी कामगाराच्या कुटुंबातील महिलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. माझे शिक्षण पूर्ण होणार की नाही? माझे वडील सहा दिवसांपासून आंदोलन सहभागी झाले आहेत. तरी शासनाकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. शासन त्यांना न्याय देत नाहीये.

माझ्या पप्पांचा पगार खूपच कमी आहे. घरी खायला सुध्दा नाहीये...मला तर विचार पडतो, की माझे शिक्षण पूर्ण होणार की नाही होणार, अशी भावनिक प्रतिक्रिया हितेश विनायक बडगुजर या चिमुकल्याने आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com