जळगावात सलुन व्यावसायिक तरुणाचा खून

मारेकरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अल्पवयीन गुन्हेगार ; एक जण ताब्यात
जळगावात सलुन व्यावसायिक तरुणाचा खून

जळगाव । Jalgaon

शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास सुनील सुरेश टेमकर (वय 36, रा.प्रजापत नगर) या तरुणाचा चाकुने भोसकून खून झाल्याची घटना घडली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान अल्पवयीन मुलांच्या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य संशयिताचा शोध सुरु होता. दरम्यान घटना याठिकाणी असलेल्या एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याची माहिती मिळाली आहे.

ब्लेड मागितल्याच्या कारणावरून वाद

सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार असे की, ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात सुनील सुरेश टेमकर हा तरुण कुटुंबासह राहत होता. त्याचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या पाच दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा दुकानावर आला. त्याने टेमकरला ब्लेड मागितले. टेमकर याने ब्लेड देण्यास नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादात अल्पवयीन मुलाने टेमकरवर छातीत चॉपरने वार केले. यात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला.

अप्पर पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट देत माहिती जाणून घेतली. मयत सुनील टेमकर याच्या पश्चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोनक, मुलगी दीप्ती, भाऊ असा परिवार आहे.

मारेकरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अल्पवयीन

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सुनील टेमकर याच्यावर वार करणारा अल्पवयीन मुलगा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तो सराईत गुन्हेगार असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर शनीपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी संशयितांबाबत माहिती काढली. यात लेंडी नाल्याजवळील पडक्या शाळेजवळ एका अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य संशयित अल्पवयीन मुलगा फरार असून त्याचाही शनीपेठ शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com