
अमळनेर : Amalner
नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री ,साठा आणि वापरावर बंदी असल्यावरही शहरात नायलॉन मांजा वापरला गेल्याने त्याचे दुष्परिणाम देखील दिसून आले. मोटारसायकलवर (Motorcyclists) जाताना एकाला नायलॉन मांजा लागून त्याचे ओठ कापले जाऊन डोळ्याला व पायाला देखील कापले गेल्याची घटना संक्रांतीच्या दिवशी दुपारी घडली.
चंद्रशेखर भावसार रा पानखिडकी हे संक्रांतीच्या दिवशी दुपारी मोटरसायकलवर धुळे रोडवरून जात होते. त्याच वेळी कापलेल्या पतंगासाठी लहान मुले रस्त्यावर पळत होते. अचानक भावसार यांच्या डोळ्याला दोऱ्याचा स्पर्श झाला लागलीच चष्म्याला दोरा घासला जाऊन ओठाला लागल्याने भावसार यांचा ओठ कापला गेला. क्षणभर त्यांना काहीच जाणवले नाही मात्र काही वेळात मोटरसायकलवर रक्त पडू लागताच त्यांना जखम झाल्याचे जाणवले. मोठ्या प्रमाणावर गंभीर जखम झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ परेश पाटील ,डॉ अलिम शेख यांनी तब्बल ३५ टाके टाकून उपचार केले.
घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आपापल्या पथकाला मांजा वर कारवाईचे आदेश दिले. आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण ,राध्येश्याम अग्रवाल व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांधलीपुरा ,इस्लामपुरा व बालाजीपुरा पतंग उत्सवात जाऊन नायलॉन मांजाचे १५ रहाट जप्त केल्या. पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील ,मधुकर पाटील यांनी देखील दुकानांवर जाऊन तपासणी केली. पोलिसांनी कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यानी मांजा लपवून घेतला.