
रावेर | प्रतिनिधी raver
मोरगांव (ता.रावेर) येथील २३ वर्षीय व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या युवकाने तापी नदीच्या (Tapi River) पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. दि.१६ रविवारी सकाळी त्याचा मृतदेह मिळून आला. याबाबत निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील पिंप्री-नांदू तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय युवकाचे नांव अक्षय जगन्नाथ महाजन आहे.त्याने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पुलावरून चुलत भाऊ समाधान महाजन ला कॉल करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती.याबाबत चुलत भावाने त्याला समजवण्याचा प्रयत्न करूनही अक्षय याने टोकाचे पाउल उचलले,याबाबत ज्या मोबाईलवरून अक्षयने चुलत भाऊ समाधानला कॉल केला होता, त्याच मोबाईलधारकाने काही वेळानंतर घडलेली घटना सांगितली.नातेवाईक तातडीने पुलाजवळ पोहचले मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असल्याने तो मिळून आला नव्हता.रविवारी सकाळी धूरखेडा येथील गोताखोरानी मृतदेह शोधून काढल्यावर,रावेर ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत अक्षय याचे वडील जगन्नाथ केऱ्हाळे येथील केळी गृप मध्ये कामाला आहे. अक्षय एकुलता एक मुलगा होता.त्यांच्या पश्चात आई वडील व बहिण असा परिवार आहे.