वाळू माफियांना मोक्का!

मांडळच्या युवकाच्या हत्येनंतर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
वाळू माफियांना मोक्का!

जळगाव । Jalgaon

वाळू माफियांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यामुळे अवैध वाळू माफियांंवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शेतकरी जयवंत कोळी यांना मंगळवारी वाळू मफियांनी फावड्याने मारहाण केली होती. नंतर अवैधरित्या वाहतूक करणार्‍या वाळू माफियांनी शेतकर्‍याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांची निर्घृण हत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर वाळू माफियांबाबत प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी संशयितांबाबत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

सर्वसामान्य नागरिकाचा जीव घेण्यापर्यंत वाळू माफियांंची मजल गेली असल्याने त्यांच्या गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी मोक्का कारवाई सारखे पाऊल उचलले आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेतील आरोपींवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मिनल यांनी दिली आहे.दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या या आदेशानंतर रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

...तर ही घटना घडली नसती

अवैध वाळू वाहतुक करणार्‍यांचे वाहन पकडल्यानंतर त्यांंच्यावर थातूर मातूर कारवाई केली जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळेच त्यांची एखाद्याची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्यापर्यंत मजल गेली असल्याचा आरोप होत आहे. मांडळ येथील घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप होवू लागला आहे. वाळू माफियांंवर यापुर्वीच कडक कारवाई केली असती तर अशी घटना घडली नसती असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

‘त्या’ तिघांंना पोलीस कोठडी

अमळनेर । येथून जवळच असलेल्या मांडळ येथे अवैद्य वाळू वाहतुकीला विरोध करणार्‍या शेतकर्‍याच्या खून प्रकरणातील सहापैकी तीन जणांना मारवड पोलिसांनी अटक केली होती, त्यात रोहित बुधा पारधी वय 19 ,सागर अशोक कोळी वय 22 ,गोलू उर्फ देविदास नरेश कोळी वय 19 सर्व राहणार मांडळ अशी अटक केलेल्या तीन जणांची नावं आहेत.

तिन्ही आरोपींना आज अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती श्रीमती जोंधळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे , यातील तीन आरोपी फरार झाले असून मारवड पोलिसांची दोन पथके शोधार्थ पाठवली आहेत .त्यांना लवकर जेरबंद करू असे एपीआय जयेश खलाने यांनी देशदूत शी बोलताना सांगितले, आरोपींना न्यायालयात नेण्यापूर्वी मारवड पोलीस ठाण्यात डीवायएसपी राकेश जाधव हे पहाटे पासून ठाण मांडून होते , अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपींचा शोध मारवड पोलीस घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com