ग्रामसेवकांचा अपहार, निधीवरुन खडाजंगी

गटविकास अधिकार्‍यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर सदस्यांनी ओढले ताशेरे
ग्रामसेवकांचा अपहार, निधीवरुन खडाजंगी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

ग्रामसेवकांकडून दप्तर गहाळप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील 8 ग्रामसेवकांवर कारवाई केली. मग जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग करतो काय ?

तसेच ग्रामनिधी कर्ज प्रकरणी ग्रामसेवकांकडून वसुली होत नसल्याने त्यांच्याकडून गटविकास अधिकार्‍यांनी काय आढावा घेतला, अशी विचारणा सदस्यांनी केली.

ग्रामसेवकांनी पदभार सोडल्यानंतर वर्षानुवर्ष दप्तर जमा करीत नाहीत. हिशोब दिला जात नाही, अशा ग्रामसेवकांवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे पाठीशी का घालतात.

त्यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासन कोणती कारवाई करणार? असा सवाल उपस्थित सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.

त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी संबंधित गटविकास अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करून ग्रामसेवकांकडून वसुलीचे आदेश दिले.

जिल्हा परिषद सर्वसाधारण समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज सभागृहात घेण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्वला म्हाळके, अतिरिक्त अतिरिक्त सीईओ गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद झालेले जवान व जिल्ह्यातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली सभागृहात श्रध्दाजंली वाहण्यात आली. त्यानंतर विषय वाचनाला एम.डी.सूर्यवंशी यांनी सुरुवात केली.

गटविकास अधिकार्‍यांकडून टोलवा टोलवी

रोजगार हमी योजना योजना पुरवणी आराखडासंदर्भात सदस्यांना विश्वासात घेतले पाहिजे. करोडो रुपयांची कामे पडलेली आहेत. कामे सुरु झाली तर मजुरांच्या हाताला कामे मिळतील. सदस्यांच्या गटात सेस फंडातून घेतलेल्या कामांकडे गटविकास अधिकारी व अभियंता यांच्यास्तरावर समन्वय ठेवला जात नाही. याकामांकडे दुर्लक्ष करुन टोलवा टोलवी केली जात असल्याचा आरोप जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी केला. त्यावर अतिरीक्त सीईओ गणेश चौधरी यांनी तात्काळ मागणीनुसार कामे सुरु करण्याचे आदेश संबंधित गटविकास अधिकार्‍यांना आदेश दिले.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा दुरुपयोग

शेंदुर्णी येथील एका खाजगी शाळा परिसरात पंधरा व्या वित्त आयोगांतर्गत व सेस फंडातून निधी वापरता येतो का? या निधीचा दुरुपयोग केला जात असल्याचा सवाल सदस्य अमित देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

थेट विषय सभागृहात येतोच कसा ?

चहार्डी ता.चोपडा येथील जि.प.शाळेची 30 बाय 30मीटरची जागा पशुवैद्यकीय दवाखानाकरिता नवीन इमारत बांधकामासाठी ठरास सुरु असताना शिक्षण समितीच्या बैठकीत हा विषय मंजूर न करता थेट सर्वसाधारण सभेत आला कसा.कोणी हा विषय पटलावर ठेवला. यावरुन नानाभाऊ महाजन,नंदकिशोर महाजन, प्रभाकर सोनवणे यांनी हा मुद्दा उचलून धरला. बायप्रासेजरनुसार जि.प.सर्वसाधारण सभेत विषय येणे गरजेचे आहे.

यांनी घेतला चर्चेत सहभाग

सदस्य प्रभाकर सोनवणे, रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, मधुकर काटे, नंदकिशोर महाजन, पोपटतात्या भोळे, गोपाळ चौधरी, अमित देशमुख, प्रतापराव पाटील, प्रा.डॉ. नीलम पाटील, पल्लवी सावकारे, जयश्री पाटील, प्रमिला पाटील, मीना पाटील, रवींद्र नाना पाटील, पं.स.सभापती मुकूंद नन्नवरे, जितेंद्र पाटील आदींना सहभाग घेतला. नियत्व प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता देता येत नाही. आम्ही चुकलो तरी चालेल. मात्र, वित्त व लेखा विभाग चुकला नाही पाहिजे. अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे, असा प्रश्न जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला.

ग्रामनिधी कर्जाची 21 कोटींची थकबाकी

ग्रामनिधी कर्जप्रकरणी 21 कोटींची ग्रामपंचायतींकडे थकबाकी आहे. ग्रामसेवकांकडून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी कारवाई का करीत नाही. जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामसेवकांवर बंदिवासाची कारवाई केली. चार वर्षांपासून तक्रारींचा पाढा वाजतोय. तरीही ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख बोटे लक्ष देत नसल्याने ही शोकांतिका आहे. विस्तार अधिकारी, बिडीओ काय करतात? तालुकानिहाय बिडिओंवर जबाबदारी द्या, अशा सूचना सदस्यांनी केल्या. ज्या ग्रामसेवकांनी वसुली केली नाही तर त्यांचे दोन वेतन कपात करणार असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी बोटे यांनी सभागृहाला दिली.

अमळनेरच्या बीडीओवरुन महिला सदस्य आमने-सामने

अमळनेरचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्याकडून पदभार काढून घेतल्यावरून सदस्या जयश्री पाटील यांनी तालुक्यात चांगले काम करीत असून त्यांचा पदभार का काढला? तोच गटविकास अधिकारी ठेवण्यात यावा, अशी मागणी लावून धरली.

त्यावर संतप्त झालेल्या सदस्य मीना पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सदर गटविकास अधिकार्‍याने महिला लोकप्रतिनिधला सन्मानाने वागणूक दिली नसल्याने त्याच्याविरोधात शंभर पुरावे आले असल्याने त्यांचा चार्ज काढून घेण्यात आला. यावरून मीना पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात आमने-सामने शाब्दिक खडाजंगी रंगली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com