समदर्शनाच्या माध्यमातून संतांच्या विचारावर मनन करा

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे आवाहन
समदर्शनाच्या माध्यमातून संतांच्या विचारावर मनन करा

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

भावनेने पाहिलेले असता सर्व ब्रह्म आहेत, परंतु क्रियांमुळे अद्वैत निर्माण झाले आहे. त्यामुळे आपण समदर्शनातून (Samdarshan) म्हणजेच सर्व भगवंताचे स्वरूप आहे असे मानणे गरजेचे आहे. प्रत्येकात भगवंताचे स्वरूप पाहा, परंतु त्यांच्याशी तुम्हाला वेगवेगळा व्यवहार करावा लागेल. हत्ती आणि मुंगी यांना जेवण मिळाले पाहिजे, परंतु त्यांच्यासोबत आपण जेवण करू शकत नाही. मानवमात्राचे कल्याण व्हावे. सर्व जीवांसह मानवमात्र एक साथ खाणे-पिणे हा व्यवहार करू शकत नाही. महाकुंभ मंथनातील (Mahakumbh Manthan) संतांच्या (saints) विचारावर मनन करून परमार्थ आणि व्यवहार (altruism and transaction) या दोघांची उत्तम सांगड घालावी, असे आवाहन परमपूज्य अनंत श्री विभूषित श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज (Jagadguru Sri Vasudevananda Saraswatiji Maharaj) (प्रयागराज) यांनी केले.

वढोदे फैजपूर येथील श्री निष्कलंक धाम येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभाच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून वासुदेवानंद सरस्वतीजी बोलत होते. व्यासपीठावर ज्ञानदेव सिंहजी महाराज, ज्ञानेश्वरदासजी महाराज, अविचलदासजी महाराज, स्वामी परमानंदजी महाराज, रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज, रवींद्रपुरीजी महाराज, कमलनयनदासजी महाराज, बालकानंदगिरीजी महाराज, राजेंद्रदासजी महाराज, जितेंद्रानंदजी महाराज यांच्यासह शेकडो संत महंत उपस्थित होते.

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्यासह तेरा संत महंतांनी आपले विचार व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी मांडले. मीडिया पत्राचे प्रकाशन संत महंतांच्या हस्ते व्यासपीठावर पार पडत असताना त्यासाठी कार्य करणार्‍या प्रा.उमाकांत पाटील व डॉ.जगदीश पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन राधे राधे बाबा यांनी तर आभार महाकुंभाचे निमंत्रक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मानले. महाकुंभाच्या दुसर्‍या दिवसाचा तसेच ब्रह्म भोजनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. रात्री दानदाता सन्मान समारंभ पार पडला. तसेच आयुर्वेदाचार्य श्री धन्वंतरी यागमध्ये प्रात:पूजन, हवन, अर्चन व दीपोत्सव पार पडला. शनिवार, दि. 31 रोजी बलिपूजन व पूर्णाहुती होणार असून सकाळी 9 ते 12 महोत्सव पूर्णाहुती होणार आहे.

महाकुंभाच्या द्वितीय सत्रात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, आपली भारतभूमी योगभूमी व तीर्थक्षेत्रांची भूमी आहे. संत जिथे जातात तिथे तीर्थ बनते आणि हे सर्व संत चालते फिरते तीर्थ आहेत. धर्मसत्ता व राजसत्ता यांनी देशासाठी काम केले पाहिजे. त्या एकमेकांना पूरक आहेत त्यामुळे आपण हिंदुत्वाची लांब रेषा ओढून बाकीच्या रेषा आपोआप आपल्याला कमी करता येतील. विवाह समारंभात आता नव्याने संस्कृती व परंपरा यांच्याविरूद्ध काही बाबी केल्या जात आहेत. त्या आपल्याला सोडाव्या लागतील. मोबाईलपासून दूर राहण्याची गरज आहे. कारण त्यामुळे विवाह तुटत असल्याचेही दिसून येत आहे. समरसतेतून सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे.

पुरुषोत्तमदास महाराज

समाजात सुमती आणि कुमती दोघेही आहेत. त्यामुळे संतांचे काम दुःख दूर करणे आहे. सर्व संतांना एकत्रित करून हा समरसता महाकुंभ एक नवी दिशा देण्याचे कार्य करणार आहे.

गोपाल चैतन्यजी महाराज

समरसता महाकुंभात सर्व संप्रदायाचे संत जमा होण्याचे मूळ कारण जनार्दन महाराज यांची मेहनत आणि त्यांच्यावर असलेले प्रेम होय. सर्व जातीधर्माचे लोक आणि संत एकत्र आले आहेत, याचीच देशाला गरज आहे. भगव्या ध्वजाखाली एकत्र आले तरच राष्ट्र जीवित राहील. गुरू जगन्नाथ महाराज या सच्चा गुरूंनी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज या सच्चा शिष्याला शोधले आणि शिष्याने सुद्धा गुरूला शोधले. त्यामुळे हा महाकुंभ सफल होत आहे.

देवेंद्रानंदगिरीजी महाराज

भक्ती व युक्ती तसेच शक्ती आणि मुक्ती या एकसाथ महाकुंभात आल्या आहेत. ज्ञानेश्वरदासजी महाराज हे राम आहेत तर सतपंथाचे हनुमान महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आहेत. त्यांच्यावर गुरूंची अनोखी कृपा आहे. आपण पुजारी नाही तर भगवान बनण्याचा विचार करा. आपल्याला हा इतिहास बलिदानामुळे मिळाला आहे. जनार्दन महाराज हे गुरूदेव जगन्नाथ यांनी पाठवलेले पैगंबर आहेत. देवेंद्रानंदगिरीजी महाराज यांनी एकापेक्षा एक शेरोशायरी करत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे कौतुक केले.

महंत बालकादासजी महाराज

संत तुकाराम महाराज यांच्यात प्रचंड संयम होता. सर्व संतांमध्ये आपल्याला संयम दिसून येईल. एकाच व्यासपीठावर सर्व संतांचे दर्शन समरसता महाकुंभात होत आहे. संत संगतीत आल्यास आपण पावन होतो, असे वेद म्हणतात. सतपंथातील जनार्दन म्हणजे जनाचे हरी आहेत. त्यांच्या मागे सनातन धर्माची शक्ती आहे.

पद्मश्री ब्रम्हेशानंदजी महाराज

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे कार्य स्वामी विवेकानंद यांच्यासारखे आहे. शिस्त पालन करणारे शिष्य आहेत. कुंभ आयोजनामागे तपस्या आहे. यातून संतांचे दर्शन होत असून सनातन हिंदू धर्म टिकवण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्यांनी युवा वर्ग जोडला आहे. त्यामुळे आपण पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करता देश व धर्माला प्रथम प्राधान्य द्यावे. व्यसने सोडावी आणि हिंदुत्व पुढे न्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित गौरीशंकरदासजी महाराज, चिदानंदगिरीजी महाराज, स्वामी वेदानंदजी महाराज, कमलनयनदासजी महाराज, अविचलदासजी महाराज, फुलोबिहारीदासजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज यांनीही आपले विचार मांडले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com