बोदवड येथे आगीत लाखोंचे नुकसान

बोदवड येथे आगीत लाखोंचे नुकसान

बोदवड । Bodwad

बोदवड शहरातील योगेश बरडिया यांच्या मालकीचे सुप्रसिद्ध रूपम प्रोव्हिजनच्या गोदामाला आज (दि.6) सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान अचानक आग लागली. या आगीमध्ये किमान एक कोटी रुपयांचा किराणा माल भस्मसात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री तायडे आणि बोदवड पोलीस तथा नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक भरतआप्पा पाटील तथा अनेक वरिष्ठ मंडळी या ठिकाणी दाखल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जामनेर आणि भुसावळ येथून अग्निशामक बंब (Fire bigred) पाचारण करण्यात आले.

रुपम प्रोव्हिजनच्या गोडाऊनमध्ये कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिक फिटिंग नाही. तसेच विजेचा दिवा सुद्धा नाही. त्यामुळे या ठिकाणी शॉर्टसर्किटने आग लागण्याचा संबंध नाही. अशी चर्चा घटनास्थळी ऐकू येत होती. रात्री उशिरापर्यंत बोदवड पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

बोदवडला अग्निशमन बंब कधी

बोदवड शहरात किमान 15 जिनिंग आणि प्रेसिंग कंपन्या आहेत. तसेच विविध व्यापारी प्रतिष्ठानचे गोदाम आहेत. आणि मुख्य म्हणजे बोदवड हे तालुक्याचे शहर आहे.परंतु या ठिकाणी नगरपंचायतीच्या मालकीची एकही सरकारी अग्निशमन बंबाची गाडी उपलब्ध नाही. याबाबत नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्याशी विचारणा केली असता, कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिन्याभरात बोदवड नगरपंचायतीच्या सेवेत अग्निशमन बंब सुरू होईल. अशी माहिती पाटील यांनी देशदूतशी बोलताना दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com