अनधिकृत बियाणे विक्री करणार्‍या दुकानदाराचा परवाना रद्द

जिल्हा कृषी विभागाची कारवाई; पाच हजारांचे बोगस बियाणे जप्त
अनधिकृत बियाणे विक्री करणार्‍या दुकानदाराचा परवाना रद्द
सोयाबीन बोगस बियाणे

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शासनामान्यता नसलेले तसेच विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणार्‍या अमळनेर येथील मे. श्रीकृष्ण ग्रो व इरिगेशन या दुकानदाराचा कृषी परवाना रद्दची कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी केली.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील कारंजा चौकातील मे. श्रीकृष्ण ग्रो व इरिगेशनचे मालक जितेंद्र दिनकर पाटील हे शासनाकडून मान्यता नसलेले तसेच विक्रीस बंदी असलेले एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करीत होते. याबाबतची माहिती कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाली त्यांनी तात्काळ कर्मचार्‍यांना सोबत घेत दुकानात सापळा रचून धाड टाकली.

त्यांच्यादुकानातून पाच हजार रुपये किंमतीचे 5 कापुस बियाणे पाकिटे जप्त केली आहे. याप्रकरणी अरुण तायडे यांच्याविरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 नुसार अंमळनेर पोलीस स्टेशन येथे 18 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्यांचा बियाणे परवाना 25 मे पासुन कायमस्वरुपी रद्द केला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिली.

या वाणाची खरेदी करु नका

एचटीबीटी या अवैध कापूस बियाणापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगामामध्ये कोणत्याही परिस्थितील शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या खरेदी करु नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास कृषि विभागाच्या दुरध्वनी क्रमांक. 0257-2239054 वर माहिती द्यावी, असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com