
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
कापूस भरुन निघालेल्या ट्रकला (truck) समोरुन येणार्या वाहनाने कट (Cut by vehicle) मारला. यामुळे ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील हातेड नाल्याच्या वळणावर पलटी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात (accident)राज रविंद्र अहिरे (भिल) (वय-20, रा. मुंगटी जि. धुळे) या तरुणाच्या ( youth) डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच (Death on the spot) मृत्यू झाला. तर वाहनातील चालकासह 7 मजूर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील (एमएच 18 एए 1080) क्रमांकाचा ट्रक कापूस घेण्यासाठी गुरुवारी सकाळी मजूरांना घेवून यावल तालुक्यात आला होता. डांभूर्णी येथे शेतकर्यांकडून कापूस भरल्यानंतर दुपारच्या सुमारास तो मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला होता.
दुपारी 3 वाजेच्या सुमारास ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील शेलीनो फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणार्या अज्ञात वाहनाने कट मारला. यात चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक हा वळणावर असलेल्या हातेड नाल्याजवळ पलटी झाला. या अपघातात ट्रकमध्ये बसलेले मजूर गंभीर जखमी झाले तर राज रविंद्र अहिरे-भिल हा तरुण जागीच ठार झाला. अपघाताची घटना घडल्यानंतर सुमारे तासभरानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वडीलांसोबत गेला होता मजूरीसाठी
राज हा वडीलांसोबत कापूस भरण्यासाठी गेला होता. कापूस भरल्यानंतर ते घराकडे परतत असतांना ट्रक पलटी झाल्याने ट्रकमधील सर्व मजूर गंभीर जखमी झाले. यामध्ये राज याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील रविंद्र अहिरे हे गंभीर जखमी झाले. मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच त्यांनी रुग्णालयातच मन हेलावणारा आक्रोश केला.
ग्रामस्थांकडून मदतकार्य
विदगाव रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती मिळताच धामणगावसह विदगाव येथील सरपंच भगवान सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी जखमींवर उपचार सुरु आहेत.
अपघातातील जखमी मजूर
अपघातात प्रमोद संभाजी पाटील (वय-40), भरत दगडू पाटील (वय-32), दिगंबर दिलीप पाटील (वय-30), रवींद्र बारकू भिल अहिरे (वय-50), जितेंद्र पवार (वय-35), निंबा दगडू पाटील (वय-36) आणि बुधा पाटील (वय-60) सर्व रा. मुंगटी ता. जि.धुळे हे गंभीर जखमी झाले आहे.
ट्रकसह झुडपांमध्ये फेकले गेल्याने मजूर जखमी
नियंत्रण सुटल्यामुळे वळणावर ट्रक पलटी झाल्याने ट्रकच्या कॅबीनसह वर बसलेले मजूर हे रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये फेकले गेले. तर काही मजूर हे थेट ट्रकखाली दाबले गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.