विजेच्या धक्क्याने मजुराचा जागीच मृत्यू

सुप्रिम कॉलनी जवळील घटना; पोलीस ठाण्यात नोंद
विजेच्या धक्क्याने मजुराचा जागीच मृत्यू

जळगाव । Jalgaon

जळगावातील सुप्रिम कॉलनीजवळील एका कंपनीत कामाला असलेल्या मजूराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश मजन बारेला (वय-22) रा. किनगाव ता. यावल ह.मु. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. याबबात अधिक माहिती अशी की, प्रकार बारेला हा पत्नी व लहान भाऊ यांच्या सोबत सुप्रिम कॉलनीत गेल्या महिन्याभरापासून राहत होता. घराजवळच प्लॉस्टिक रिसायकलींग करण्याच्या कंपनीत लहान भावासह कामाला होता. नेहमीप्रमाणे बुधवार 19 एप्रिल रोजी प्रकाश बारेला हा कामावर असतांना दुपारी 3 वाजेच्या दरम्यान रिसायकलींग करणारे मशीन चालू करण्यासाठी गेला.

मशीन चालू करत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला यात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्याला इतर सहकार्‍यांनी तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात वडील, पत्नी काजल, दोन भाऊ अनिल आणि बाळू असा परिवार आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण पाटील आणि पोकॉ ढवळे करीत आहे.

तिन महिन्यापूवीच लग्न

विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या प्रकाश बारेला याचे गेल्या तीन महिन्यापुर्वीच लग्न झाले होते. कामाच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरापासून पत्नी व लहान भावासोबत आला होता. या घटनेमुळे बारेला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com