अजित पवारांसमोरच खडसे-डॉ. सतीश पाटलांमध्ये ठिणगी

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांमध्येच गटबाजीचे दर्शन; कार्यकर्त्यांमध्ये रंगली चर्चा
अजित पवारांसमोरच खडसे-डॉ. सतीश पाटलांमध्ये ठिणगी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पक्ष संघटनेच्या (party organization) विषयावरून राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांच्या समोरच व्यासपीठावर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे (Former Minister Eknathrao Khadse) आणि डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी (spark of controversy) पडली. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यातच (NCP workers should meet) व्यासपीठावरील नेत्यांमधील गटबाजीचे (factionalism among leaders) दर्शन (darshan) कार्यकर्त्यांना घडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजित पवार आज जिल्हा दौर्‍यावर होते. या दौर्‍यात जळगाव येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. ना. अजित पवार हे शिस्तप्रिय नेता म्हणून प्रख्यात आहे. मात्र आज त्यांच्याच उपस्थितीत नेत्यांमधील बेशिस्तीचे दर्शन कार्यकर्त्यांना घडले.

चंद्रकांत पाटलांवरही खडसेंनी साधला निशाणा

जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही आमदार फुटून शिंदे गटात गेले. प्रत्यक्षात पाच नव्हे तर चारच आमदार सेनेचे आहेत. पाचवा मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्याच भरवश्यावर निवडून आला. मात्र तो आपल्यालाही झाला नाही आणि उध्दव ठाकरेंनाही झाला नाही. मग तो शिंदेंना तरी काय होणार? आता खोके मिळाल्याने त्यांना कुणाची गरज नाही असे सांगत आ. एकनाथराव खडसे यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार

निवडून येतील - देवकर

कार्यकर्ता मेळाव्यात मनोगत व्यक्त करतांना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, अडीच वर्ष आघाडी सरकार होते. याकाळात राज्यात चांगली कामे झाली. मात्र शिवसेनेत फुट पडल्याने राज्यातील सत्ता समीकरण बदलले. आघाडी असतांना आम्हाला मात्र चिंता होती की पुढील निवडणूका लढायच्या कशा? शिंदेंनी मात्र आमची ही अडचण दूर केली. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही आमदार फुटले. हे आमदार आता निवडून येणार नाही. यासोबतच भाजपाचे दोन आमदारही निवडून येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे किमान सात आमदार निवडून येतील असा दावा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला.

मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार ओबीसी सेलचे उमेश नेमाडे यांनी मानले.

चोपडा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सज्ज व्हा

चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जातप्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मी शिवसेना आणि काँग्रेसशी चर्चा करून आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असेही ना. अजित पवार यांनी सांगितले.

माजी आ. डॉ. सतीश पाटलांची टोलेबाजी

मेळाव्यात मार्गदर्शन करतांना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक शैलीत पक्षातीलच नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, सध्या आपल्या पक्षात सगळेच माजी आहेत आणि केवळ 2 आजी आहेत. मागच्या काळात मी एकमेव आमदार असतांना संपुर्ण जिल्हा फिरायचो. अनिलदादा आता तुम्ही फक्त मतदारसंघापुरता मर्यादीत न राहता जिल्हाभरात आपले वजन वापरा असा टोला लगावला. नाथाभाऊ तुम्ही नेते आहात आम्हाला कमी करू नका, सांभाळुन घ्या, आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, असे म्हणत खडसेंनाही त्यांनी टोला लगावला. आपल्या पक्षाचे नेते आले की सगळे येतात आणि ते परतल्यावर दुसर्‍या दिवशी दोन-चार कार्यकर्ते दिसतात. काही जण फेसबुकवर नेत्यांसोबतचे फोटो फिरवतात. तर काही जण दिवसभर राष्ट्रवादी करतात आणि चाळीसगाव आले की ‘तेरे जैसा यार कहाँ’ असे सांगत पक्षातील कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

अजितदादा अशाने मुख्यमंत्री होणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहीजे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष पॉवरफुल पाहिजे. दादा आता तरी भाकरी फिरवा असे सांगत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रवींद्र पाटील यांनी ‘मी बाजूला व्हायला तयार आहे’ असे सांगताच डॉ. सतीश पाटील यांनी मी काही कुणाला काढा असे म्हणत नाही असे स्पष्ट केले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतांना गेली अडीच वर्ष आमच्यावर अन्यायच झाला. पण आम्ही पक्ष सोडला नाही. जोपर्यंत 125 आमदार होणार नाही तोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही असे सांगत डॉ. सतीश पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली.

आ. खडसेंनीही दिले प्रत्युत्तर

कार्यकर्ता मेळाव्यात आ. एकनाथराव खडसे यांनी संघटना या विषयावर राष्ट्रवादीतील उणीवा दाखविल्या. आ. खडसे म्हणाले की, माजी आ. डॉ. सतीश पाटील यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी स्वत:पासूनच करावी असा टोला त्यांनी लगावला. त्यावर डॉ. सतीश पाटील यांनी हजरजबाबी उत्तर देत मी तयार असल्याचे ना. अजित पवारांसमोरच सांगताच व्यासपीठावरील नेत्यांच्या चेहर्‍यावर तणावाचे वातावरण दिसून आले. आ. खडसे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादी पाचवरून एकवर आली ती केवळ माझ्यामुळेच. मी भाजपात असतांना संघटन मजबूत केले. मात्र आता राष्ट्रवादी पुन्हा पाचवर आणण्याची माझी जबाबदारी आहे. मात्र पक्षातील गटबाजी आधी संपविली पाहिजे.

ओके-खोके म्हणून चालणार नाही, तर तळागाळापर्यंत या सरकारचे अपयश सांगावे लागणार आहे. सद्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घरगुती गॅस व इंधनाचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिथे जाल तिथे राज्य आणि केंद्र सरकारच्या या मारक धोरणांविरुध्द लोकांना माहिती द्या. किती दिवस पवारांच्या गुडविलवर मते मागणार, तुमचे स्वत:चे कर्तृत्व दाखवा ना असे सांगत आ. खडसे यांनी कार्यकर्त्यांची शाळाच घेतली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाल्याशिवाय पुढील निवडणुका जिंकता येणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे असा कानमंत्री आ. खडसे यांनी दिला.

ना. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

25 मिनीटाच्या मार्गदर्शनपर भाषणात ना. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. ना. अजित पवार यांनी सांगितले की, जिल्ह्यात आपण सर्व माजी का? याचं स्वत: आत्मचिंतन करा. सभासद नोंदणीसाठी दिलेली पुस्तके काय हळदीकुंकू वाहायला दिले का? असे सांगत मी पुन्हा 1 डिसेंबरला जळगावला येणार आहे तोपर्यंत सभासद नोंदणी पूर्ण झाली पाहिजे असा सज्जड दमच ना. पवार यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना भरला. कार्यकर्ते म्हणतात आम्हाला ताकद द्या, आता काय तुम्हाला खजूर, काजू, बदाम, पिस्ता आणून देऊ असे सांगताच हास्याचे फवारे उडाले.

रोहीत पवार यांनी भाजपाच्या मंत्र्याला पराभूत केले. कर्जत-जामखेड हा मतदार संघ रोहितसाठी नवीन असतांनादेखील त्याठिकाणी त्याने मेहनत घेतली. आणि तीन टर्म निवडुन आलेल्या आमदाराला घरी बसविले. राज्यातील राजकीय परिस्थीती बदलली आहे. आज जर बाळासाहेब असते तर शिंदेंची त्यांनी बिनपाण्यानेच केली असती अशी टिकाही ना. पवार यांनी केली.

अनिल पाटलांच्या वजनाने तुटला सोफा

आमदार अनिल पाटील यांचे भाषण आटोपल्यानंतर ते व्यासपीठावरील सोफ्यावर येऊन बसले. त्यांच्या शेजारी जिल्हा बँकेच्या संचालिका अ‍ॅड. रोहिणी खडसे आणि महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी ह्या देखिल बसल्या होत्या. आ. अनिल पाटील यांच्या वजनामुळे सोफा अचानक तुटल्याने अ‍ॅड. रोहिणी खडसे आणि वंदना चौधरी या खालीच बसल्या. यावेळी अनिलदादांचे वजन किती? अशी चर्चा होताच हंशा पिकला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com