
जळगाव । Jalgaon
खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घरफोडी व सरकारी नोकराव हल्ला यासह 11 गंभीर गुन्हे दाखल असलेला समीर हनीफ काकर (वय-20, बिसमिल्ला चौक, तांबापुरा) याला स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी काढले. त्याची नागपुर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
समीर काकर याच्याविरुद्ध 11 विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याला वेळोवेळी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. परंतु न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर तो सराईतपणे गुन्हे करीत होता. तसेच आपल्यासोबत असलेल्या गुंडासोबत घातक शस्त्रे ठेवून नागरिकांवर दहशत निर्माण करीत होता.
त्यामुळे त्याला कायद्याचा देखील अजिबात धााक राहिलेला नसल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षतेची भावना तयार झाली होती. त्यामुळे त्याच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दि. 2 फेब्रुवारी रोजी समीर काकरचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.