जिल्ह्यातील 716 ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार

जवाहर रोजगार हमी योजना अपहारप्रकरणात 7 कोटींची थकबाकी
जळगाव जि.प
जळगाव जि.प

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शासनाच्या जवाहर रोजगार योजना, ग्रामनिधी योजना, संपूर्ण ग्रामीण योजना अशा विविध योजनेतून जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी गावांमध्ये पुरेशी कामे केलेली नाही.

काही ठिकाणी कामांमध्ये अपूर्ण अशा विविध गावातील कामांचे मूल्याकंन करण्यात येऊन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील 716 गावातील ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात जवाहर रोजगार योजना, ग्रामनिधी योजना, संपूर्ण ग्रामीण योजना अशा योजनांची कामे राबविण्यात आली होती.

मात्र, काही गावांमध्ये विकास कामाच्या योजनांवर खर्च न करता सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर रक्कमा हडपल्या. तर काहींनी कामे अपूर्ण असूनही परस्पर रक्कमांवर डल्ला मारला होता.

जि.प. प्रशासनाकडून या गावातील कामांचे मूल्याकंन करण्यात आल्यानंतर चौकशी समितीने जिल्ह्यातील 716 गावांवर अपहाराचा ठपका ठेवला असून त्यांच्याकडून 7 कोटींची थकीत रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.

सरपंचांच्या मालमत्तेवर टाच

जिल्ह्यातील 716 ग्रामपंचायतींमध्ये तत्कालीन सरपंच यांच्यावर अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच ज्यांनी अपहाराची रक्कम भरणार नाहीत. त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली जाणार आहे. ज्या गावांमध्ये तत्कालीन सरपंच हयातीत नाहीत अशा गावांविषयी जिल्हा परिषद प्रशासन त्यावर निर्णय घेतला जाईल.

जिल्ह्यात 716 गावांच्या अपहार रकमेपोटी 7 कोटींची थकबाकी असल्याने जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांना पत्र देवून संबंधीत गावातील ग्रामसेवकांकडून ही थकीत रक्कम वसूल करण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने पत्र पाठविले आहे.

गट विकास अधिकार्‍यांकडून अहवाल आल्यानंतर संबंधीत ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई निश्चित करण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com