
जळगाव - Jalgaon :
जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचा मृत्यू अटळ आहे. हे निर्विवाद सत्य असूनही मनुष्य आयुष्यभर काबाड कष्ट करुन परिवाराच्या सुखासाठी नेहमीच धडपडत असतो. मात्र, काही माणसं स्वत:च्या कुटुंबासह मित्रपरिवार आणि गावासाठी चांगले कार्य करुन नेहमी स्मरणात राहतात.
त्याचप्रमाणे वाकडी येथील शेतकरी रामचंद्र शामा गायकवाड यांचे 18 मे रोजी वयाच्या 80 व्यावर्षी निधन झाले. गायकवाड परिवाराने रुढी,परंपरेला फाटा देत स्मशानभूमीतच वृक्षारोपण करुन त्यांच्या अस्थिचे विसर्जन त्याच ठिकाणी करुन समाजासमोर एक नवा पायंडा पाडला.
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील रहिवाशी रामचंद्र शामा गायकवाड यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी शेती आणि मातीशी नाते जोडून काळ्या आईची सेवा करीत आयुष्यभर काबाड कष्ट केले. लग्नानंतर त्यांच्या वंशवेलीवर चार फुले उमलली. प्रकाश, रामदास,विकास आणि ज्ञानेवर या मुलांना शिक्षण देवून लहानाचे मोठे केले. प्रत्येकाला आपल्या पायावर उभे करताना अपार कष्ट आणि मेहनतीतून श्रमाला मोल देण्याचा धडा दिला आणि तोच वसा आणि वारसा गायकवाड परिवार जपत आहे.
शेतकरी रामचंद्र शामा गायकवाड (वय 80) यांचे 18 मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गायकवाड परिवाराने परंपरेनुसार वडिलांचे अस्थि विसर्जन नदीत न करता त्यांनी वाकडी गावातील नवीन स्मशानभूूमित वडिलांच्या आठवणी कायमस्वरुपी स्मरणात राहावी म्हणून त्याच ठिकाणी आणि परिसरात वृक्षारोपण करुन झाडाजवळच अस्थिचे विसर्जन केले.
सध्या करोनाच्या महामारीत करोनाग्रस्त रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन देवून वाचविण्यासाठी सर्वत्र धडपड सुरु आहे. अशावेळी प्रत्येकाला वृक्षाचे महत्व समजू लागले आहे. म्हणून गायकवाड परिवाराने वडिलांचा अंत्यविधी स्मशानभूमित करुन त्याच परिसरात इतरांना अग्नीडाग देण्यासाठी येणार्या नागरिकांना झाडाची सावली मिळावी, म्हणून गायकवाड परिवारातील मयताचा मुलगा तथा सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर गायकवाड,पुतणे श्रीपत गायकवाड, राजेंद्र गायकवाड ,रमेश गायकवाड(ग्राम पंचायत सदस्य वाकडी), प्रमोद गायकवाड, नातू प्रवीण गायकवाड यांनी स्मशानभूमीत वृक्षारोपणा नवा पायंडा पाडला आहे.