भरती-ओहोटी

भरती-ओहोटी

डॉ.गोपी सोरडे

जळगाव - Jalgaon

समुद्राला ज्या प्रमाणे भरती-ओहोटी येते, त्याचप्रमाणे जळगाव महानगर पालिकेतील राजकारणाला भरती-ओहोटी आली आहे. भाजपने ज्या पध्दतीने गेमप्लान केला होता, त्याचपध्दतीने शिवसेनेनेही कित्ता गिरावलाय.

महापालिकेच्या 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला भरती आली होती. तर शिवसेनेला ओहोटी आली होती. निवडणुकीत भाजपचे 57 नगरसेवक निवडून आले आणि त्यांनी महानगरपालिकेवर निर्विवादपणे सत्ता स्थापन केली.

मात्र, अडीच वर्षातच भाजपच्या सत्तेला ग्रहण लागले. अंतर्गत गटबाजीमुळे सुरुवातीला 27 नगरसेवकांनी बंडखोरी करुन भाजपच्या सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेशी हातमिळवणी केली. आणि महापालिकेत सत्तांतर होवून शिवसेनेच्या हातात पुन्हा सत्ता आली.

जळगाव शहराच्या विकासासाठी आणि सत्तेसाठी शिवसेनेने भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अर्थात ठाकरे सरकार असल्यामुळे शिवसेनेला भरती येवू लागलीय. भाजपच्या 27 बंडखोरांनंतर मागील दहा दिवसांत भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलेय.

आता पुन्हा नऊ ते दहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. वास्तविक पाहता, सत्ता स्थापन केल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा शहराच्या विकासाला अधिक गती देणे हिताचे ठरणार आहे.

परंतू, भाजपने बंडखोर नगरसेवकांविरुध्द अपात्रतेसाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई अटळ आहे. मात्र ही कारवाई टाळण्यासाठी बंडखोरांना स्वतंत्र गट स्थापन करणे, अभिप्रेत आहे. आणि त्यामुळेच जळगाव महानगरपलिकेच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडीचे सत्र सुरु झाले आहे. खरंतर सत्ता कोणाचीही असो, जनतेला सत्तेचे काही घेणेदेणे नाही.

पाहीजे तो फक्त विकास! भाजपने ज्या पध्दतीने आश्वासने दिली. ती प्रतिपुर्ती होवू शकली नाही. आणि शेवटी बहुमतातली सत्ता गमवावी लागली. त्यामुळे आता, शिवसेनेने या बाबींचा विचार करणे, चिंतन आणि मनन करणे गरजेचे आहे. नाहीतर मग ‘येरे माझ्या मागल्या’सारखी गत व्हायला फार वेळ लागणार नाही.

शिवसेनेने आता अडीच वर्षांच्या कालावधित शहराचा विकासावर भर देवून जनतेची सहानुभूती मिळवावी. एवढीमात्र अपेक्षा आहे. नाहीतर मग, पुन्हा भरती-ओहोटीचा कित्ता गिरायला फार वेळ लागणार नाहीय.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com