
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
खूनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैदी आजारी होता. त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येथे पोलिसांनी त्याला नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव केल्याने कैद्याने आपल्या हातातील हातकडी डोक्यात मारुन घेत स्वत:ला जखमी केल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी त्या कैद्यावर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शहरातील जिल्हा कारागृहात खून प्रकरणातील संशयीत आरोपी महेंद्र अशोक महाजन (वय-27) हा न्यायालयीन कोठडीत आहे. महेंद्रच्या पोटात दुखत असल्याने त्याला आज उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
महेंद्रने रुग्णालयात त्याला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आग्रह धरला. परंतु पोलिसांनी त्याला भेटण्याची परवानगी नाकारल्याने महेंद्रने संतापाच्या भरात त्याच्या हातात घातलेली लोखंडाची हातकडी स्वत:च्या डोक्यात मारुन घेतली. यामुळे महेंद्रच्या डोक्याला दुखापत होवू रक्तस्त्राव झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता.
महेंद्रवर उपचार सुरु
महेंद्रच्या डोक्याला जखम झाल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करीत त्याला पोलिस बंदोबस्तात शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कैछी वार्डात दाखल केले.
तसेच महेंद्रसोबत असलेला सुमित किशोर जोशी (29) याच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याने त्यालाही उपचारासाठी आणण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचार्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.