
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) अमळनेर (Amalner) तालुक्यातील पातोंडा (Patonda) येथील व सध्या अंबड (Ambad Nashik) गावानजीक असलेल्या कंफर्ट झोन सोसायटीतील रहिवासी गणेश सोनवणे (Ganesh Sonawane) या सैन्यदलातील जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे....
नुकतेच दिवंगत सोनवणे यांनी त्यांच्या मुलीला फोन करून सांगितले होते की, मी 30 ऑक्टोबरला सेवा निवृत्त होत आहे, त्यानंतर बेटा आपण सर्वजण सोबतच राहू आणि हो माझ्या साहेबांनी आणि माझ्या सोबती असलेल्या सर्व मित्रांनी मला एक चार चाकी गाडी गिफ्ट दिली आहे.
आपण खूपच मज्जा करू बेटा! असे आपल्या मुलीला त्यांनी सांगितले. सोनवणे यांना पुढील २०-२२ दिवस कधी जातील आणि कधी मी घरी परत जाईल सर्वांना भेटेल असे झाले होते. दुसरीकडे त्यांच्या घरचेही या महिन्याच्या अखेरची वाट बघत होते.
अचानक काल (दि ०५) सैन्यदलातील एका अधिकाऱ्याचा फोन खणाणला आणि त्यांनी सांगितले की, जम्मू कश्मीर येथे एका अपघातात गणेश सोनवणे या जवानाचे निधन झाले. अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
सोनवणे कुटुंबीयांचे दुर्दैव असे की, गणेश सोनवणे यांचे दोन्ही बंधूचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. काल ते देशसेवा करीत असतांना शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा पार्थिव आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड येथील निवासस्थानी येणार असून त्यांचा अंत्यविधी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे होणार आहे.