लाखो रुपयांत फसवणूक करणारे दोघे जेरबंद

शहर पोलिसांच्या मदतीने छत्तीसगड पोलिसांकडून आरोपींना अटक
लाखो रुपयांत फसवणूक करणारे दोघे जेरबंद

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

दुकानदाराकडून लिप्ट बनविण्याचे पार्ट खरेदी करुन पैसे न देणे यासह इतर दोघांकडून अ‍ॅडव्हान्स रक्कम घेवून लिप्ट बसविण्याचे काम न करुन देता दहा लाख रुपयांत तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यात शनिवार, 31 जुलै रोजी छत्तीसगढ पोलिसांनी जळगाव शहर पोलिसांच्या मदतीने जळगाव शहरातील भजे गल्ली येथून दोन संशयितांना अटक केली आहे.

विजय मुरलीधर महाजन वय 36 व पवन शिवाजी पाटील वय 26 दोन्ही रा. अहमदाबाद अशी दोघा संशयितांनी नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, छत्तीसगढ राज्यातील सिव्हील लाईन रायपूर येथे मोहम्मद आमीर मोहम्मद हिदायतउल्ला वय 38 हे वास्तव्यास आहेत. ते लिप्ट बसविण्याकामी आवश्यक स्पेअरपार्ट विक्रीचे काम करतात.

26 जुलै रोजी लिप्ट बसविण्याचे काम करणारे अहमदाबाद येथील ठेकेदार विजय मुरलीधर महाजन यांनी हॉस्पिटलमध्ये ऑटोमॅटीक लिप्ट बसविण्याच्या कामासाठी लागणारे स्पेअर पार्ट मोहम्मद आमीर यांच्याकडून खरेदी केले. मात्र पैसे नंतर देतो सांगून पेैसे देण्यास टाळाटाळ केली.

तसेच याचप्रमाणे इतर दोन जणांकडून अ‍ॅडव्हान्समध्ये विजय महाजन यांनी पैसे घेवून पैशांच्या बदल्यात लिप्ट बसविण्याचे काम करण्यास टाळाटाळ केली होती. तिघांची महाजन याने तब्बल दहा लाख रुपयांत फसवणूक केली होती.

फसवणुकीची खात्री झाल्यावर मोहम्मद आमीर यांच्यासह इतर दोघांनी रायपूर येथील न्यु शांतीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यावरुन विजय महाजन याच्याविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्हयात विजय महाजन फरार होता.

भजे गल्लीतील एका हॉटेलातून संशयित अटकेत

विजय महाजन हा जळगाव शहरात असल्याचे तांत्रिक माहितीच्या आधारे छत्तीसगढ पोलिसांना कळाले. त्यानुसार छत्तीसगढ येथून सहाय्यक फौजदार शिवकुमार शाहू, पोलीस कॉन्स्टेबल अमित यादव, विक्रम वर्मा यांचे पथक शनिवार, 31 जुलै रोजी जळगावात दाखल झाले.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे यांनी बातमीदारामार्फत संशयितांबाबत माहिती काढली. जळगाव शहरातील भजे गल्लीतील एका संशयित असल्याची माहिती मिळाल्यावर प्रफुल्ल धांडे याच्यासह छत्तीसगढ पोलिसांनी विजय महाजन व पवन पाटील या दोघांना अटक केली.

दोघांना ताब्यात घेत पथक छत्तीसगढकडे रवाना झाले. शहर पोलिसांच्या अलर्ट पोलिसिंगमुळे अवघ्या काही तासातच लाखो रुपयांत फसवणुक करणार्‍या संशयितांना छत्तीसगढ पोलिसांनी अटक केली आहे.

संशयितांनी राज्यभरात विविध ठिकाणी अशाप्रकारे फसवणुक केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com