
जळगाव - Jalgaon :
शहरातील शिवाजीनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरुन पैसे आणावेत म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ करणार्या शेगाव येथील पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात आज गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजीनगर येथील गायत्री सुनील मोरे वय ३१ यांचा २०१२ मध्ये शेगाव येथील सुनील उर्फ अविनाश रामचंद्र मोरे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर गायत्री यांनी माहेरुन दीड लाख रुपये आणावेत म्हणून पतीसह जेठ, जेठाणी यांच्याकडून मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरुवात झाली. याच पैशांच्या कारणावर पतीकडून मारहाणही करण्यात आली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी तसेच भुसावळ येथे तिच्या मामाच्या घरी गेले. याठिकाणी पतीसह सासरच्यांकडून शिवीगाळ करुन शारिरीक व मानसिक त्रास देण्यात आला. त्रास असह्य झाल्यानंतर विवाहिता शिवाजीनगरात माहेरी आल्यानंतर आज गुरुवारी तिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन पती सुनील उर्फ अविनाश रामचंद्र मोरे, सासू कोकीळाबार्ठ उर्फ वत्सलाबाई रामचंद्र मोरे, जेठ विनोद रामचंद्र मोरे, जेठाणी राखी विनोद मोरे, जेठ राजेंद्र रामचंद्र मोरे, जेठाणी कमल राजेंद्र मोरे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र परदेशी करीत आहेत.