जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
जिल्ह्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणावरची मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 73 हजार 92 नागरिकांनी लसीचा पहिला तर 2 लाख 38 हजार 417 नागरिकांनी करोनाचा दुसरा डोस घेतला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 11 हजार 509 नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतल्या जिल्ह्यात लसीकरणाने दहा लाखांचा टप्पा पार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले.
त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले तर 1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली.
याकरिता जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालये आदि ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.
62 हजार हेल्थ केअर्सनेचे झाले लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत 62 हजार 979 डोस हेल्थ केअर वर्कर्सनी लसींचे डोस घेतला आहे. यामध्ये पहिला डोस 30 हजार 468 तर दुसरा डोस 20 हजार 702 व्यक्तींनी घेतला आहे. तर 90 हजार 28 डोस फ्रंटलाईन वर्कर्सला दिलेत.
त्यात पहिला डोस 62 हजार 979 व्यक्तींनी, तर 27 हजार 49 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचबरोबर 45 वर्षावरील 7 लाख 16 हजार 70 नागरिकांना लसीचे डोस दिलेत. त्यात पहिला डोस 4 लाख 63 हजार 804 व्यक्तींनी तर दूसरा डोस 1 लाख 72 हजार 266 व्यक्तींनी घेतल्याची नोंद शासनाच्या कोविन पोर्टलवर देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे आल्याने जिल्ह्यात करोना लसीकरणास वेग आला आहे.