
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
राज्यात हॉट सिटी ( hot) म्हणून प्रसिध्द असलेला जळगाव जिल्हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. रविवारी कमाल तापमान 37 अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. तर आज शुक्रवारी तापमानाचा (mercury) पारा 36 अंशावर कायम होता. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात उष्णतेच्या लाट येणार असून तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
जळगाव जिल्हा सर्वाधिक कमाल तापमानासाठी प्रसिध्द आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिल शेवटचा आठवडा व मे महिन्यात कमाल तापमान 45 अंशावरपर्यंत गेल्याची नोंद आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून जळगाव जिल्हा तापायला सुरुवात होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे जात असतो. मात्र, यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानाने 37 अंशापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.
कमाल तापमानामध्ये सतत वाढ होत असून, सध्या पारा 36 अंशांवर आहे. एकीकडे दिवसा वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असतांना जळगाव जिल्ह्याचे रात्रीचे तापमान मात्र 10 अंशांवर असल्याने रात्री थंडीची जाणीव अद्याप कायम आहे.दिवसा व रात्रीच्या तापमानात असलेल्या या मोठ्या तफावतीमुळे जिल्ह्यात व्हायरल आजारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सर्दी खोकल्याने जळगावातील अबालवृध्द हैराण झाले आहेत. यंदा जळगाव जिल्ह्यात किमान तापमान देखील विक्रमी राहिल्याने सर्वाधिक थंडीचा अनुभव देखील जळगावकरांनी घेतला आहे.