
जळगाव - Jalgaon
जिल्ह्यात कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. राज्यातील राजकीय परीस्थिती आता बदलली आहे. आपण केलेल्या त्यागामुळेच भाजपा आज सत्तेत आहे. म्हणून भाजपानेही मोठेपणा दाखविण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे बुधवारी शिवसेनेची जिल्हा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या निवडणुकांमध्ये भाजपासोबतच आपल्याला युतीच्या माध्यमातून विरोधकांशी लढावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर फारशी ताणाताण न करता भाजपासोबत जुळवून घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदारांनी स्थानिक पातळीवर तालुका बैठका घेऊन भाजपाच्याही पदाधिकार्यांना बोलावून घ्यावे. भाजपाचे काही लोक आगाऊ आहेत. ते विरोधकांशी हातमिळवणी करून युतीधर्माला छेद देण्याचा प्रयत्न करतील. मात्र अशा लोकांपासून आपण सावध रहायचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जेवढी ताकद आपण आपल्या पक्षासाठी लावू तेवढीच ती भाजपासाठीही लावावी. आगामी काळात होणार्या निवडणुका जिंकण्यासाठी युती करूनच बाजार समितीच्या निवडणुका लढविल्या जातील असे सांगत युतीवर शिक्कामोर्तब केले.