
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्ह्यातील खाणपट्ट्यांची (mines) नाशिक विभागीय कार्यालयाच्या पथकाकडून ईटीएस प्रणालीद्वारे मोजणी (Mojani) केली जात असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान या मोजणीसाठी 24 कर्मचारी आणि तीन अधिकारी जिल्ह्यात दाखल असून नागपूरच्या पथकाकडून मुक्ताईनगरातील गौण खनिज घाटांचीही मोजणी केली जाणार आहे.
वर्षभरात गौण खनिजाचे नेमके किती आणि कसे उत्खनन झाले आहे? याची माहिती घेण्यासाठी विविध जिल्ह्यातील पथकांद्वारे घाटांची मोजणी केली जाते. ही मोजणी करण्यासाठी ईटीएस या प्रणालीचा वापर केला जातो.
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने जळगाव जिल्ह्यातील गौण खनिजाच्या घाटांची मोजणी करण्यासाठी 24 कर्मचारी आणि तीन अधिकारी असे 27 जणांचे पथक नेमले असून या पथकाकडून घाटांची मोजणी सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. या गौण खनिजाच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागालाही आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील घाटांच्या मोजणीचा अहवाल हा त्या-त्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे.
मुक्ताईनगरातील घाटांची होणार मोजणी
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यात गौण खनिजाचा 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिजाच्या घाटांचीही मोजणी नागपूरच्या पथकाकडून केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.