नागरिकांच्या जीवनाशी निगडित योजनांच्या पूर्णत्वास प्राधान्य-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

चोपडा येथे पाणीपुरवठा योजना व जलशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन
नागरिकांच्या जीवनाशी निगडित योजनांच्या पूर्णत्वास प्राधान्य-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

जळगाव - jalgaon

‘कोविड- 19’ (Covid- 19) या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात मोठी घट झाली असूनही नागरिकांच्या आरोग्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निगडित असलेल्या योजनांना राज्यातील महाविकास आघाडी शासन प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे (Home Minister Dilip Walse-Patil) गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले.

चोपडा (chopada), जि.जळगाव नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा (अंदाजपत्रकीय रक्कम 64.76 कोटी रुपये) योजनेंतर्गत जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचा उद्घाटन सोहळा गृहमंत्री श्री.वळसे- पाटील यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री एकनाथराव खडसे, उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, माजी खासदार ॲड.वसंतराव मोरे, माजी आमदार डॉ.सतीश पाटील, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, कैलास पाटील, मनीष जैन, रविंद्र पाटील, संदिप पाटील आदी उपस्थित होते.

गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबर पोलिस दलाची कामेही वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर चोपडा आणि अडावद पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोलिसांच्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाला आदराची वागणूक देऊन प्रत्येक नागरिकांची तक्रार सोडविण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिलेत.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पाणी हा मूलभूत प्रश्न आहे. प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 27 हजार गावांमध्ये 15 हजार कोटी रुपये खर्चाचा पाणीपुरवठ्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 828 गावांसाठी 926 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्याबरोबर चोपडा शहराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून अडावदकरीता 28 कोटी रुपयांचा, तर धानोरा गावासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील पोलीस दलासाठी 36 चारचाकी तर 30 दुचाकी वाहने देण्यात आली आहेत. पाळधी येथे पोलीस स्टेशन निर्मितीची मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी श्री.अरूण गुजराथी यांनी शहराकरीता भूमिगत गटार योजनेला मंजूरी मिळण्याची मागणी केली. जीवन चौधरी यांनी नगरपालिकेमार्फत पूर्ण केलेल्या, सुरू असलेल्या व यापुढे करण्यात येणा-या कामांची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी नगरपालिकेच्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार अनिल गावीत यांच्यासह

आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिक, चोपडा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com