शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

जळगाव - Jalgaon

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हवेतून (Oxygen production project) ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे (Guardian Minister Gulabrao Patil) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या 36 हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ वाढवून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले.

यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्र.प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले आदि उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा साथरोग काळात तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना बरे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत.

जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या पीएसए ऑक्सिजन प्लांटची मान्यवरांनी पाहणी केली. या कार्यक्रमासाठी ऑक्सिजन प्लांटचे समन्वयक डॉ. संदीप पटेल, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. विलास मालकर यांच्यासह डॉ. इम्रान तेली, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वैभव सोनार, डॉ. योगिता बावस्कर, डॉ.उमेश जाधव, असिस्टंट मेट्रेन आशा चिखलकर यांच्यासह अधिकारी दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, संजय चौधरी, संजय पाथरूट, महेश गुंडाळे आदि अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ऑक्सिजन प्रकल्पाची वैशिष्ट्य

साथरोग तसेच कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत ऑक्सिजन रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत जीवरक्षक वायू ठरत आहे. जगभरात रुग्णांची संख्या वाढून त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली.

अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची जागेवरच निर्मिती व्हावी यासाठी पी एस ए ऑक्सिजन जनरेशन प्लांट ही संकल्पना निर्माण झाली. या प्लांटद्वारे हवेतुनच ऑक्सिजनची जागेवर निर्मिती केली जाते. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनवर अवलंबून रहावे लागत नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्लांट हा एक हजार लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन निर्माण करू शकतो. याठिकाणी दिवसाला साधारण १.८७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन निर्माण होईल. जो रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचा ठरेल. हा प्लांट पीएम केअर अंतर्गत डीआरडीओ व राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Related Stories

No stories found.