पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

सावखेडा येथील हृदयद्रावक घटना
पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

वरखेडी/पाचोरा । Pachora

सावखेडा बु.॥ येथे दि.28 रोजी रात्री 3 वाजता झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून ठार केल्यानंतर घरातून पळ काढून सावखेडा शिवरातील माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला गळफास घेत स्वतःचेही जीवन संपविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पत्नीस ठार करून स्वतः गळफास घेणारा इसम काही प्रमाणात वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पिंपळगाव (हरे.) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, सहाय्यक फौजदार विजय माळी, हवालदार दीपकसिंग पाटील, संदिप राजपूत, वाहनचालक दीपक अहिरे यांनी पंचनामा केला. मयत पती, पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी केले.

सावखेडा बु.(ता.पाचोरा) येथे दि.28 रोजी गुरुवारी रात्री सतीश धनसिंग परदेशी (वय 38), गायत्री सतीश परदेशी (वय 32), सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंब निद्रावस्थेत झोपी गेल्यानंतर शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान सतीश धनसिंग परदेशी याने गाढझोपेत असलेल्या पत्नी गायत्री हिचा दोन्ही हाताने गळा आवळून ठार केले.

नंतर घराबाहेर निघत असतांना आरडाओरड करून पळत असतानांच शेजारच्या घरी राहत असलेल्या त्याचा लहान भाऊ संदीप परदेशी यांना सदरची बाब लक्षात आल्यानंतर त्याने सतीशचा पाठलाग करून त्यास पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करीत आहेस? अशी विचारणा केली असता सतीशने सांगितले की, तू मला का अडवतो आहेस, मी माझी पत्नी गायत्री हिचा गळा दाबून खून केला आहे. असे सांगताच सतीशच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता संदीपने घरात जाऊन बघितले असता गायत्री मृत अवस्थेत तर दोघे मुले झोपलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्यानंतर सतीश परदेशी याने गावाबाहेर पळत जाऊन येथील माजी सरपंच गोकूळसिंग नथ्थूसिंग परदेशी यांच्या शेतात गेल्यानंतर पळसाच्या झाडावर चढत अंगात असलेल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्याभोवती आवळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सकाळी घडलेल्या प्रकाराची वार्ता गावभर वार्‍यासारखी पसरल्यानंतर सतीशचा शोध सुरू झाला. दरम्यान गावातीलच संजय धना सोनवणे हे सकाळी 9 वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतीश धनसिंग परदेशी याचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात पळत जाऊन घटनेची माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com