
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
राज्यात खळबळ उडवून देणार्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडांच्या तपासात जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कामगिरीची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली आहे.
बोरखेडा हत्याकांडाची घटना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ण्ड डेव्हलेपमेंट विभागातर्फे अभ्यासासाठी निवडण्यात आली आहे.
आज सोमवारी यापार्श्वभूमिवर झालेल्या वेबिनारमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ऑनलाईन सादरीकरण केले. या वेबिनारमध्ये सहभागी असलेल्या डॉ. मुंढे हे राज्यातील एकमेव पोलीस अधीक्षक होते.
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे झालेल्या चौघं भावंडाच्या हत्येच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली असून सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या दालनातून ऑनलाईन सादरीकरण केले.
बोरखेडा हत्याकांडाचा तपास हा जिल्हा पोलीस दलासाठी आव्हान होते. सलग चार दिवस पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी बोरखेडा व रावेरात ठाण मांडून तेथे नियंत्रण कक्ष तयार केला होता.
मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक सतत संपर्कात राहून आढावा घेत होते. क्लीष्ट असलेला तपास चार दिवसात करुन आरोपी निष्पन्न करण्यात आला होता.
निर्दोष व्यक्ती यात गोवला जावू नये याची विशेष खबरदारी जिल्हा पोलीस दलाकडून या हत्यांकांडाचा तपास करत असतांना घेण्यात आली.
यात सुरुवातीला चार आरोपींचे नावे आली होती, शेवटी तपासात तांत्रिक, शास्त्रीय पुरावे समोर आल्यानंतर नेमका आरोपी निष्पन्न करुन पोलिसांनी अटक केली होती.
महाराष्ट्रातून फक्त बोरखेड्याचीच घटना अभ्यासाठी घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमिवर आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आयोजित वेबिनारमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे या हत्याकांडाच्या तपासासह विविध बाबींबाबत ऑनलाईन सादरीकरणे केले.
बोरखेडा हत्याकांडाच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल घेणे ही बाब म्हणजे जिल्हा पोलीस दलासाठी भूषणावह बाब आहे.