रिक्षा चालवुन सांभाळतात पंचायत समितीचा कारभार

माजी आ.दिलीप भोळेही चालवत होते रिक्षा
रिक्षा चालवुन सांभाळतात पंचायत समितीचा कारभार

वरणगाव, ता.भुसावळ Bhusawal

भुसावळ पंचायत समितीचे तळवेल गणातील सदस्य विजय सुरवाडे हे आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली रिक्षा चालवुन पंचायत समितीचा कारभार सांभाळत आहेत. सुरवाडे हे पंचायत समितीमधील शिवसेनेचे एकमेव सदस्य आहेत.

सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणूकीत तळवेल गण हा आरक्षीत निघाल्याने या गणातुन शिवसेनेकडुन रिक्षा चालक विजय भास्कर सुरवाडे यांना उमेदवारी देण्यात आली.

विजय सुरवाडे हे वरणगाव ते तळवेल व परिसरात रिक्षा चालवत असल्याने या गणातील मतदारांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. यामुळे त्यांच्या शांत- संयमी व मिळावु स्वभावाने मतदारांना आकर्षित करून त्यांनी विजयश्री खेचून आणली व ते भुसावळ पंचायत समितीमधील शिवसेनेचे एकमेव सदस्य ठरले.

पंचायत समितीचे सदस्य असलेतरी ते कुठल्याही प्रकारे राजकीय अविर्भाव न आणता आज रोजीही आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली ऑटो रिक्षा चालवुन मतदारांच्या समस्या जाणून त्या पंचायत समितीमध्ये मांडुन पंचायत समितीचाही कारभार सांभाळत आहेत. तसेच त्यांनी पंचायत समितीकडुन प्राप्त होणाऱ्या निधीतुन आपल्या गणात विविध विकासकामे सुरू ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे मतदारांकडुन कौतुक केले जात आहे.

तसेच तळवेल - हतनुर या जिल्हा परिषद गटातुन दर्यापूर येथील रहीवासी असलेल्या सरला सुनिल कोळी यांनीही शिवसेनेकडुन उमेदवारी मिळवुन विजयश्री खेचून आणली. त्यांचे पती विवाह व इतर समारंभातील भोजनाचे कार्यक्रम घेत असतात. इतरांनी मात्र, संधीचे सोने करून विविध योजनांची शासकीय कंत्राटीची कामे नातलगांच्या नावावर घेवुन श्रीमंतीकडे वाटचाल करीत असल्याची चर्चा सुरु आहे.

माजी आ.दिलीप भोळेही चालवत होते रिक्षा

भुसावळ विधानसभा मतदार संघातील खडका येथील रहीवासी शिवसेनेचे माजी आमदार दिलीप भोळे हे सुध्दा आमदार होण्यापुर्वी भुसावळ ते खडका व परिसरात रिक्षा चालवत होते. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भोळे यांची पक्षनिष्ठा व हातोटी न्याहाळून त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली. यामध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणली व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास सार्थक ठरवला. सद्यस्थितीत मात्र, ते प्रकृतीच्या कारणास्तव शिवसेनेच्या कार्यक्रमाला फारसे उपस्थित राहत नाहीत.

माजी सभापती करताहेत रखवालीचे काम

वरणगांव फॅक्टरी दर्यापूर गणातुन १९९७ मध्ये भाजपाकडुन विजयी झालेले राजेंद्र गुरचळ यांना आरक्षणानुसार पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळाली होती. त्यानंतर सुध्दा ते पुन्हा दुसऱ्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले. असे भुसावळ पंचायत समितीचे सभापती पद भूषवलेले राजेंद्र गुरचळ आज रोजी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या फुलगाव येथील उड्डाणपुलाच्या कामावर रखवालीचे (सेक्युरीटीचे) काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com