दिवाळीचा हर्षोल्लास...

दिवाळीचा हर्षोल्लास...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यासह जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाच्या निर्बंधाविना सर्वत्र दिपोत्सव (Dipotsav) साजरा करण्यात येत आहे. कोरोनाचे निर्बंध नसल्याने दिपोत्सवाचा अपूर्व असा उत्साह (Enthusiasm) नागरिकांमध्ये दिसून आला. हर्षोउल्लोस पूर्ण वातावरण, विधीवत लक्ष्मीपूजन,(Lakshmi Pujan) फटाक्यांच्या आतीषबाजीने (fireworks)जल्लोषात यंदा नागरिकांतर्फे दिवाळी साजरी (Celebration) करण्यात आली.

अनेकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरूपुष्पांजली योग असल्याने मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी ज्वेलर्स दुकानात गर्दी केली आहे. तर दुसरीकडे बुकींग केलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरी घेवून जाण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून आली. गुरुवारी दिवसभर जळगावच्या बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी झाल्याने बाजारपेठेत चैतन्य पसरले होते.

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध असल्याने या निर्बंधातच गेल्या वर्षीही दिवाळी साजरी झाली होती. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले, यंदा मंदीरे तर उघडलीच, मात्र सर्व सण उत्सव पूर्वीप्रमाणे उल्हासपूर्ण वातावरणात साजरे करण्यात येत आहे. त्यानुसारच गुरुवारी कोरोनाच्या निर्बंधाविना तब्बल दोन वर्षानंतर आज दिवाळी सण साजरा करण्यात आला.

काही दिवसांपासून दिवाळीच्या निमित्ताने घराची साफसफाई सुरु होती. ती पूर्ण होवून गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने लक्ष्मीच्या स्वागतासाठी अंगणात आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच दारांवर आंब्याच्या पानांचे तोरण, झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सजावट करण्यात आली होती. प्रत्येक घरोघरी सायंकाळी अंगावर नवीन वस्त्र परिधान करत मुहूर्तावर विधिवत पध्दतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. घरासह अनेकांनी आपल्या व्यवसाय, दुकान, कार्यालय याठिकाणी साफसफाई करत विद्युत रोषणाई, रांगोळी, झेंडूच्या फुलांच्या माळा, तोरण लावून सजावट केली. सुख समुध्दी लाभू दे, निरोगी आयुष्य दे, अशी प्रार्थनाही लक्ष्मीमातेकडे करण्यात आली. चिवडा, लाडू, शंकरपाड्यासह विविध अशा फराळाचाही लक्ष्मीला नैवेद्य दाखविण्यात आला. लक्ष्मीपूजनानंतर रात्री उशीरापर्यंत कुटुंबातील सदस्यांसोबत फटाक्यांची आतिषबाजी करत मनमुराद आनंद लुटला.

जळगाव शहर उजळून निघाले

दिवाळीनिमित्ताने अनेक जण घरात नवनवीन गृहपयोगी वस्तू खरेदी करत असते. त्यानुसार अनेकांनी बुक करुन ठेवलेल्या टीव्हीसह विविध वस्तू लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरी नेण्यात आल्या. सराफा व्यावसायिकांकडे सोने खरेदीसाठी अनेकांनी गुरुवारी गर्दी होती. तर बाजारपेठेतही नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. सराफ बाजार, दाणाबाजार, राजकमल रोड, टॉवर चौक, घाणेकर चौक या परिसरात नागरिकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळाले. अनेकांनी मित्र परिवाराकडे जावूवन प्रत्यक्ष भेट घेवून शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सकाळपासून वेगवेगळ्या स्टीकरसह विविध माध्यमांतून शुभेच्छांचा पाऊस पडला होता.

घराघरासमोरील पणत्यांचा लख्ख लख्ख प्रकाश, तसेच विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजळून निघाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com