यावल वार्तापत्र : ना. गुलाबराव पाटलांच्या आश्वासनामुळे शेत शिवारातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

यावल वार्तापत्र : ना. गुलाबराव पाटलांच्या आश्वासनामुळे शेत शिवारातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

यावल तालुक्यातील पूर्वेकडील भागात व तापी नदी काठावरील परिसरात भारत स्वातंत्र्य नंतर शेत शिवारात आज पावेतो रस्त्यांकडे खर्‍या अर्थाने लक्ष दिले गेले नाही त्यामुळे शेतकरी शेवटची घटिका मोजत असून पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे जाऊन आपली गार्‍हाणी या परिसरातील जनतेने मांडल्याने त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांच्या आता आशा पल्लवीत होऊ लागले आहेत.

यावल तालुक्यातील कोसगाव, रिधोरी, दुसखेडा, कासवा, पाडळसा, करंजी, वडोदे, वनोली परिसरात शेत शिवारात रस्त्यांची आजही बोंबाबोंब आहे. पावसाळ्यामध्ये शेतकर्‍यांना मटेरियल पोहोचवणे किंवा शेती मशागतीसाठी शेतात जाणे मुश्किली चे ठरत आहे.

पेरणीनंतर आता मजूरही शेतामध्ये लांब पर्यंत पाणी येण्यास धजावत नाहीत. शेतकरी वर्ग अत्यंत रस्त्यांअभावी त्रस्त झालेला असून शेतीमध्ये उत्पादित मालाला घरापर्यंत आणण्याकरता उत्पन्नापेक्षा आता जास्त खर्च होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत.

भारत स्वातंत्र्य नंतर आज पावेतो तालुक्यामधील आमदारांनी सोयीनुसार राजकारण केली माजी आमदार तथा खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी पाडळसे कोसगाव वनोली रिधोरी या रस्त्याचे भाग्य उजळले त्यामुळे कमीत कमी या परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला मात्र महत्त्वाचा रस्ता म्हणजे बामनोद- वनोली - कोसगाव - दुसखेडा हा रस्ता आतापावेतो 1974 ते 78 च्या रोजगार हमीच्या कामावर नंतर चिमूटभर सुद्धा माती कोसगाव ते दूस खेडा रस्त्यावर पडलेली नाही. नेमकी या परिसरात बामणोद- पाडळसे -कोसगाव येथील शेतकर्‍यांची शेतजमीन आहे रस्त्या अभावी बागायती क्षेत्र अत्यल्प आहेत. दुबार पिके घ्यावी लागतात जे शेतकरी केळी बागायती करते त्यांना मोठ्या प्रमाणावर शेतीतील उत्पादित माल बाहेर काढण्यासाठी पैसा मोजावा लागतो ही आजची वस्तुस्थिती आहे दुसखेडा - बामणोद हा रस्ता खर्‍या अर्थाने रेल्वे स्टेशन साठी जाण्यास हा पूर्वी महत्त्वाचा होता मात्र आतापर्यंतच्या राजकारण्यांनी लक्ष्य घातले नाही.

पाडळसे ते कासवा रस्त्याला लागून असलेल्या कोसगाव - दुसखेडा शेत-शिवार या रस्त्याचे खर्‍या अर्थाने कमीत कमी पालक मंत्री पानंद रस्त्यांमधून रस्ता होणे अपेक्षित होते मात्र आज पर्यंतच्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार किंवा परिसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले नाही निवडणुकीपुरते फक्त आश्वासने देऊन निघून जातात मात्र निवडणूक संपली की पुढच्या पाच वर्षाने भेटा अशी तालुक्यातील राजकीय स्थिती आहे.

राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नाही व शत्रू नाही ही म्हण फक्त तोंडामध्ये असते मात्र तसे होत नाही निवडणुकीत त्यांनी मला मतं दिली नाही म्हणून तो भाग अविकसितच राहतो अशी तालुक्यातील दयनीय अवस्था आहे. आजही पालकमंत्री पाणंद रस्त्याचा सर्वे लोकप्रतिनिधी तर सोडाच मात्र प्रशासकीय अधिकार्‍यांनी सादि पाहणी सुद्धा केलेली नाही गेल्या दोन वर्षापासून अधिकार्‍यांच्या विनवण्या केल्या जात आहेत मात्र तो आमचा रस्ता नाही, सार्वजनिक बांधकामाकडे आहे, तर जिल्हा परिषद वाले सांगतात आमच्याकडे निधी नाही, आणि सार्वजनिक बांधकाम खाते सांगते तो अगोदर जिल्हा परिषद करेल तेव्हा आमच्याकडे वर्ग होईल अशी उडवाउडवी केली जाते.

जिल्ह्याला पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील हे सुद्धा कर्तुत्ववान व्यक्ती लाभलेले आहेत या परिसरातील कोसगाव - दुसखेडा, तसेच कासवा निमजाय माता मार्ग रिधोरी, कोसगाव ते रिधोरी या रस्त्यांसाठी डॉक्टर कैलास पाटील, माजी सरपंच नारायण चव्हाण, चंपालाल पाटील, चुनीलाल पाटील, मधुकर महाजन, विश्वनाथ पाटील, बाळु पाटील ,निंबाजी पाटील यांच्यासह आदींनी पाळधी तालुका धरणगाव येथे जाऊन पालक मंत्री यांच्या निवासस्थानी चर्चा केली व परिसरातील रस्त्यांमुळे आम्हाला काय त्रास आहे? याची कथा व्यक्त केली त्या दृष्टिकोनातून नामदार पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी या रस्त्या संदर्भात सर्व अधिकार्यांची भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून लवकरात लवकर या रस्त्यांची कामांसंदर्भात अहवाल तयार करा आणि प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले असून येणार्‍या पुढील काही कालखंडामध्ये ही रस्ते कोणत्या योजनेतून बसतील .? त्यासाठी निधी किती लागेल? अशी चर्चा करून लवकरात लवकर या रस्त्यांविषयी योग्य ती कारवाई पुढील वर्षापर्यंत दिसेल असे आश्वासित केल्याने परिसरातील नागरिकांच्या आता आशा पल्लवित झालेल्या आहेत.

याच धर्तीवर यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष दादा चौधरी यांनी मागील काही दिवसापूर्वी पानंद रस्ते पहिल्या टप्प्यात मंजूर केले मात्र या परिसरातील एकही रस्ता मंजूर झालेला नाही कमीत कमी शिरीष दादांनी या रस्त्यांकडे पुढील टप्प्यात तरी लक्ष घालावे अशी अपेक्षा कोसगाव - कासवा- दुसखेडा - रिधोरी _ पाडळसे परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com