
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांची (roads) परिस्थीती अत्यंत भयावह आहे. खराब रस्त्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये लोकप्रतिनीधींविषयी प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी लक्षात घेता येत्या सहा महिन्यात जळगाव शहरातील संपूर्ण रस्ते चकाचक (shiny) करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी ‘दै. देशदूत’ शी बोलतांना दिली.
जळगाव शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत सोमवारी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त देविदास पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीबाबत ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, जळगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी किमान 200 कोटी रूपयांची गरज आहे. त्यामुळे दोन टप्प्यात हा निधी देण्याविषयीची भूमिका उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही मांडली. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून पहिल्या टप्प्यात 100 कोटी रूपये देण्याला सहमती दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यातील कामे झाल्यानंतर दुसर्या टप्प्यासाठी उर्वरीत 100 कोटी रूपये मिळणार आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात जळगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती ना. गिरीश महाजन यांनी दिली.
मोठ्या कंत्राटदाराला काम देणार
रस्त्यांची कामे स्थानिक कंत्राटदाराकडून करून न घेता मोठ्या कंपन्यांना ही कामे दिली जाणार आहेत. जेणेकरून सर्व कामे एकच कंत्राटदाराकडून पण चांगल्या दर्जाची करून घेण्याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तसेच म्हाडाच्या घरांचेही ऑडीट करून त्याचे काम पूर्ण करून घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.