अमळनेरातील काँग्रेस भवन विक्रीचा घाट!

जिल्हाध्यक्षांनी तयार केली समिती गठीत; जागेबाबत पश्रश्रेष्ठी अनभिज्ञ
अमळनेरातील काँग्रेस  भवन विक्रीचा घाट!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

देशात दि. 28 डिसेंबरला काँग्रेस पक्षाला (Congress party) 136 वर्ष पूर्ण होत आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या पक्षाचे अमळनेर (Amalner) येथील तालुका काँग्रेस भवन विक्रीला (Congress building sale) काढण्याची वेळ काँग्रेसवर येऊन ठेपली आहे. अनेक वर्षांपासून ही जागा दुर्लक्षित राहिल्याने काँगे्रसचा इतिहास असलेली ही जागा आता विकली जाणार असुन त्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (District President Pradeep Pawar) यांनी सात सदस्यीय समितीदेखील (seven-member committee) गठीत केली आहे. या जागेच्या विक्रीच्या प्रक्रियेची माहिती वरीष्ठांना नसल्याची देखील चर्चा सुरु आहे.

गेल्या दहा वर्षांअगोदर केंद्रात आणि राज्यात सातत्याने सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाची स्थापना दि. 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली. काँग्रेस पक्ष 136 वर्ष पूर्ण करून 137 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन जळगाव जिल्ह्यात झाले असल्याने जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जळगाव जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गत दोन दशकांपासून मात्र काँग्रेसची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखीच आहे. अशात जिल्हा काँग्रेसमध्ये नुकतीच खांदेपालट करण्यात आली. भडगावचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी जिल्हा दौरे केले. या दौर्‍यांवेळी अमळनेर तालुक्यातही त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकर्‍यांशी चर्चा केली होती. अमळनेर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या मालकीची दोन हजार चौ.फु.जागा आहे. ही जागा विकण्याचा घाट काँग्रेसकडूननच घातला जात आहे.

प्रदेश काँग्रेसला माहिती देणार - प्रदीप पवार

अमळनेरची जागा ही खुप जुनी आहे. त्या जागेवर आता झाडेझुडपे उगवली असुन ही जागा विकुन काँग्रेस भवनाची नवीन इमारत करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. या व्यवहाराच्या प्रक्रियेची माहिती प्रदेश काँग्रेसला दिली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले.

स्थापनादिनानित्ति जिल्हा काँग्रेस भवनात उद्या कार्यक्रम

काँग्रेस पक्षाला 136 वर्ष पूर्ण होत असल्याने दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून जिल्हा काँग्रेस भवन येथे वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली. या कार्यक्रमात नागरिकांना आणि शहरातील प्रतिष्ठितांना आमंत्रीत करण्यात आले असुन काँग्रेस पक्षाचा इतिहास आणि संपुर्ण माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया विभागातर्फे प्रशिक्षण शिबीर

जिल्हा काँग्रेस भवन येथे आज सोशल मीडिया विभागातर्फे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबीरासाठी राज्य समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण, प्रशिक्षण प्रमुख विजयानंद पोळ यांनी सोशल मीडियाच्या वापरासंबंधी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, प्रदेश सचिव विनोद कोळपकर यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रदीप सोनवणे यांनी तर आभार मोहसीन पिंजारी यांनी मानले.

यावेळी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, अमिना तडवी, योगीता शुक्ल, छाया कोरडे, राहुल भालेराव, युवक शहराध्यक्ष मुजीब पटेल, उध्दव वाणी, गोपाल मिस्तरी, डॉ. व्ही.डी. पाटील, अल्ताफ शेख, मनोज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख आदी उपस्थित होते.

विक्रीबाबत पश्रश्रेष्ठी अंधारात

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेच्या विक्रीसाठी चक्क सात जणांची समिती गठीत करण्यात आली असुन या समितीला विक्रीचे सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिले आहे. दरम्यान ह्या जागेच्या विक्रीबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींना खबर नसल्याची माहिती नसून पश्रश्रेष्ठी अनभिज्ञ असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे ही जागा परस्पर विकण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा खुद्द पक्षाच्या पदाधिकार्यांमध्येच रंगत आहे.

Related Stories

No stories found.