बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी तीन कोटी रुपयांचा निधी - मंत्री उदय सामंत

बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी तीन कोटी रुपयांचा निधी - मंत्री उदय सामंत

जळगाव - jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhary) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (North Maharashtra University) बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी (State Government) राज्य सरकारकडून तीन कोटी रुपयांची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) यांनी केली.

तर विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी केली.

विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवार, दि.२६ फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात दोन्ही मंत्री महोदयांनी वरील घोषणा केली. यावेळी मंचावर प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, (MLA Sanjay Saavkare) आमदार संजय सावकारे, महापौर जयश्री महाजन, संचालक धनराज माने, डॉ.अभय वाघ, राजीव मिश्रा, श्रीमती शालिनी इंगोले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे, विभागातील अधिकारी तसेच विद्यापीठ प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.सामंत यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून उच्च शिक्षणातील सर्वच घटकांनी कार्यरत राहण्याचे भान ठेवावे. राज्य सरकारने २०८८ शिक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राचार्य पदाचा कालावधीचा प्रश्न मार्गी लावला जाईल. धुळे व नंदुरबार येथे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेसाठी येणाऱ्या अडचणी सोडविल्या जातील.

या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावरील ७ जणांना नोकरीत सामावून घेत असल्याचे मोठे समाधान मिळत आहे. राज्य शासन आणि विद्यापीठ आपसात समन्वय ठेवल्यास विकासाचे प्रस्ताव मार्गी लागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून तीन कोटी रुपये राज्य शासनाकडून दिले जाणार असून त्यावर वर्षाकाठी मिळणाऱ्या १७ लाख रुपयांच्या व्याजावर हे केंद्र विद्यापीठाने उत्तमरित्या चालवावे असे श्री.सामंत म्हणाले.

पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांनी विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा

उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून एक कोटी रुपये दिले जातील. तसेच विद्यापीठातील पाणी व वाहतूकीचा प्रश्न सुटावा यासाठी जुना बांभोरी पुलाचे बांधकाम करुन बंधारा कम पूल तयार केला जाण्याचा ४० कोटीचा प्रस्ताव बांधकाम मंत्री यांचे कडे दिला असून त्याचा पाठपुरावा केला जाईल.

या कार्यक्रमात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्‍हयातून प्राप्त झालेल्या ३४० निवेदनांपैकी ३०९ अर्जांवर सकारात्मक निर्णय झाला असून हे प्रमाण ९१ टक्के आहे. उर्वरीत तक्रारींबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी दिली. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडी अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेऊन श्री. सामंत यांनी त्या सोडविल्या.

प्राप्त झालेल्या निवेदनामध्ये भरती, पीएच.डी. वेतनवाढ, उन्नत अभिवृध्दी योजना, शिष्यवृत्ती सवलत, रिफ्रशेर कोर्स, कालबध्द पदोन्नती, सातवा वेतन आयोग, अनुदान, भविष्य निर्वाह निधी , शिक्षक मान्यता, पदनाम व वेतनश्रेणी, वैद्यकीय खर्च, महाविद्यालयाकडून फी सदंर्भात होत असलेल्या अडचणी, विद्यार्थी समस्या आदींचा समावेश होता.

प्रारंभी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबद्दल मंत्री उदय सामंत यांचे अभिनंदन करुन अनेक प्रश्न यातून मार्गी लागत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॅा.आशुतोष पाटील व प्रा.मधुलिका सोनवणे यांनी केले. विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत सादर केले. प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे यांनी आभार मानले.

या समारंभात श्री.सामंत यांच्या हस्ते विद्यापीठातील अनुंकपा तत्त्वावरील नऊ जणांना नियुक्तीपत्रे तसेच आठ जणांना दोन लाखांवर रकमा असलेल्या वैद्यकीय खर्चाचे देयक आणि अंतिम भविष्य निर्वाह निधीचे नऊ जणांना धनादेश देण्यात आले. विद्यार्थी सुरक्षा विमा योजने अंतर्गत विद्यार्थी कैलास राजेंद्र फालक यांच्या निधनामुळे त्याचे पालक श्री.राजेंद्र फालक यांना १० हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.

व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत संवाद

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी सकाळी व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत स्वतंत्र चर्चा केली. विद्यापीठाचे विविध प्रश्न व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील, प्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.मोहन पावरा, प्राचार्य एल. पी. देशमुख, प्रा.एस. आर. चौधरी, एस.आर.गोहिल यांनी मांडले. त्यामध्ये विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा व निधी, नवीन विद्यार्थी वसतिगृहासाठी निधी, गिरणा नदीवर बंधारा, मोलगी येथील विद्यापीठ संचलित महाविद्यालयासाठी निधी व जागा, बहिणाबाई चौधरी अध्यासनासाठी पदे व निधी, वेतन अनुदानाचे अंकेक्षण आदी विषयांचा समावेश होता.

या प्रश्नांवर बोलतांना श्री.सामंत यांनी मोलगी येथील विद्यापीठ संचलित महाविद्यालय आणि धुळे उपकेंद्रासाठी जागा या दोन्ही प्रश्नांवर दोन्ही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली जाईल. तसेच योग विज्ञान प्रशाळेच्या प्रस्तावावर विचार केला जाईल असे सांगून या प्रस्तावांचा पाठपुरावा विद्यापीठानेही करावा अशी सूचना केली.

अधिसभा सभागृहात विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांनी मुख्य कार्यक्रमाआधी अधिसभागृहात प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य प्रतिनिधी म्हणून प्राचार्य एस.आर. जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.अनील पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, प्रा.एकनाथ नेहेते, महिलांच्यावतीने प्रा.मनीषा इंदाणी, विद्यार्थ्यांच्यावतीने दौड यांनी आपल्या समस्या मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले. यावेळी मंचावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार संजय सावकारे, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, संचालक धनराज माने, प्रभारी कुलसचिव रा.ल.शिंदे आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com