भुसावळ शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

भुसावळ शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव - jalgaon

भुसावळ (bhusawal) शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहराच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना, वाहतूक व दळण -वळण अशा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटिव्ही (cctv) लावण्यासाठी मुबलक प्रमाणात निधी देण्यात येईल भुसावळ शहराच्या सर्वांगिन विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन (Deputy Chief Minister Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भुसावळ नगरपालिकेतर्फे (Bhusawal Municipality) एकूण 11.41 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि 6.41 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता (Minister Gulabrao Patil) मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, माजी मंत्री आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा परिसराच्या नुतनीकरणाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भुसावळ शहरात अ वर्ग नगरपालिका आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नगरपालिकेची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव दिल्यास शासन या बाबतीत विचार करेल, जेणेकरुन विविध विकास योजना शहरात राबविणे शक्य होईल. पोलिस यंत्रणा शहरातील कायदा व सुव्यवस्था चोखपणे सांभाळत आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी सीसीटिव्ही लावण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल. शहरवासीयांनी तापी नदीचे पावित्र राखावे जेणेकरुन शहरवासीयांसाठी पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत अबाधित राहील. शहरात क्रीडांगण, उद्यान, आर्थिक विकास क्षेत्र, भाजीमंडईसाठीचे आरक्षण ठेवावे. अतिक्रमण हटवावे जेणेकरुन शहर सुटसुटीत राहील. तसेच शहराच्या विकासासाठी नगरपालिकेने उत्पन्नवाढीचे मार्ग शोधावे. कोरोना काळात भुसावळ शहरात आरोग्य यंत्रणेसह विविध यंत्रणांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली. तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता घरोघरी लसीकरण करण्यावर भर द्यावा असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी विविध क्षेत्रातील कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळ शहराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक निधीतून 28 कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच अमृत योजनेचा 185 कोटी रुपयांचा दुसरा टप्पा मंजूर करावा जेणेकरुन शहरामध्ये अनेक विकासकामे पूर्ण करण्यात येतील.

माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, नगरपालिकेने अनेक नवनवीन उपक्रम घेवून शहराची विकासाकडे वाटचाल सुरु केलेली आहे. पालिकेंतर्गत यापूढे अनेक उपक्रम राबविण्यासाठी शासनाने सहकार्य करावे.

माजी मंत्री तथा आमदार संजय सावकारे बोलतांना म्हणाले की, भुसावळ शहराच्या विकासासाठी आमदार निधीतून 3 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहे. यापुढेही विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगराध्यक्ष रमण भोळे यांनी भूमिपुजन होणार्‍या व लोकार्पण करण्यात येणार्‍या कामांची माहिती दिली. तसेच नगरपालिकेच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.

यावेळी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक तसेच जि.प. सदस्य, प.स. सदस्य व ग्रा.पं. सदस्य तसेच शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com