
जळगाव : jalgaon
ट्रेडींग खाते तयार करुन त्यावर आभासी नफ्याचे आमिषाने चंद्रशेखर संतोषराव देशमुख (वय ६७,रा.एसएमआयटी कॉलेज नगर) या सेवानिवृत्त एलआयसी अधिकार्याची ७ लाख ५६ हजार ६५४ रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. डिसेंबर २०२० ते २९ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत घडलेल्या घटनेप्रकरणी मंगळवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शक्ती व रिचर्डस असे नाव सांगणार्या अनोळखी व्यक्तींनी व्हॉटसप कॉल करुन एक बनावट वेबसाईट पाठविली. त्यावर ट्रेडींग खाते तयार करण्यास सांगून या खात्यात आभासी नफा दाखवून त्या नफ्याच्या ५० टक्के रक्कम भरण्यास सांगितले. देशमुख यांनी वेळोवेळी या सायबर गुन्हेगारांना ६ लाख ५४ हजार १८९ रुपये ऑनलाईन पाठविले.
यानंतर देशमुख यांनी नफ्याची रक्कम मागितली असता आणखी एकाने १ लाख ३ हजार ४६५ रुपये परस्पर ऑनलाईन वळवून घेतले. या प्रकरणात देशमुख यांचे ७ लाख ५६ हजार ६५४ रुपये ऑनलाईन गेले. ना नफा मिळाला ना भरलेली रक्कम परत मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार शक्ती, रिचर्डस व आणखी एका जणाविरुध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.