
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University ) अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या 10 जागांची संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया गुरूवारी पहाटे सव्वातीन वाजता पूर्ण झाली आहे. यात विद्यापीठ विकास मंचने (University Development Forum) 9 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित अधिसभेवर झेंडा (flag was hoisted) फडकविला आहे. तर महाविकास विकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून आलेला असून नऊ जागांवर उमेदवार पराभूत झाल्याने महाविकास विकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला जवळपास 17 तास मतमोजणी प्रक्रिया चालली. खुल्या संवर्गातून 5 जागा निवडून द्यावयाच्या होत्या. पहिल्या फेरीत अमोल पाटील व विष्णू भंगाळे निवडून आले. मात्र, उर्वरित तीन उमेदवारांना निर्धारीत कोटा पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर अमोल मराठे हे विजयी झाले. तर नवव्या फेरीअखेर सुनील निकम आणि अमोल सोनवणे यांनी कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विनोद पाटील, निवडणूक विभाग प्रमुख इंजि.राजेश पाटील, फुलचंद अग्रवाल, डॉ. मुनाफ शेख यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेऊन अत्यंत शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
विजयी उमेदवारांची नावे व मते
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी काल झालेल्या मतमोजणी अखेर विजयी झालेल्या उमेदवारांची नावे व प्राप्त झालेली मते पुढील प्रमाणे- खुला संवर्ग एकूण जागा 5 विजयी उमेदवार अमोल नाना पाटील (पहिल्या फेरीत विजयी, प्राप्त मते 2051), विष्णू भंगाळे (पहिल्या फेरीत विजयी, प्राप्त मते 1686), अमोल मराठे (सातव्या फेरीअखेर विजयी, प्राप्त मते 1675), सुनील निकम (नवव्याफेरी अखेर विजयी, प्राप्त मते 1736), अमोल सोनवणे (नवव्या फेरीअखेर विजयी, प्राप्त मते 1671), इतर मागास संवर्ग जागा 1 विजयी उमेदवार- नितीन झाल्टे (प्राप्त मते 6860 ), अनुसूचित जाती संवर्ग जागा 1 विजयी उमेदवार-दिनेश खरात (प्राप्त मते 6719), अनुसूचित जमाती संवर्ग जागा 1 विजयी उमेदवार नितीन ठाकूर (प्राप्त मते 7676), विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्ग जागा 1 विजयी उमेदवार दिनेश चव्हाण (प्राप्त मते 7151), महिला संवर्ग जागा 1 विजयी उमेदवार स्वप्नाली महाजन (प्राप्त मते 6238) विजयी झाल्या आहेत. विजयी उमेदवारांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र देण्यात आले.
1630 मतांचा कोटा निश्चित
विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून खुल्या संवर्गातून अमोल पाटील आणि विष्णू भंगाळे हे दोघे पहिल्या फेरीत निवडून आले. खुल्या संवर्गातून 5 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. या संवर्गात 9 हजार 779 मते वैध ठरली तर 1 हजार 362 मते अवैध ठरली. निवडून येण्यासाठी 1 हजार 630 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. अमोल पाटील यांना 2 हजार 51 तर विष्णू भंगाळे यांना 1 हजार 686 मते प्राप्त झाली. निर्धारित कोटयापेक्षा जास्त मते पडल्यामुळे या दोघांना विजयी घोषित करण्यात आले.