
जळगाव । प्रतिनिधी jalgaon
नूतन सीईओ अंकित यांनी सोमवारी जळगाव जिल्हा परिषदेचा दभार स्वीकारला. त्यानंतर सानेगुजी सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यात सीईओ म्हणून रुजू झाल्यानंतर प्रथम शिक्षण विभागात सेमी इंग्रजीच्या शाळा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महिला बचतगटांच्या माध्यमातून केळी वरील प्रक्रिया देखील चालना देण्यात येईल, अशी ग्वाही नूतन सीईओ अंकित यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना दिली.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नूतन सीईओ श्री. अंकित यांनी जळगाव जिल्हा परिषदेचा दि. 24 जुलै रोजी पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्निल बाहेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांचे स्वागत केले. तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांकडून जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले की, यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाच्या योजना जिल्हा परिषदेत सुरू केलेल्या आहेत. अशाच पद्धतीने त्या सुरू ठेवण्यात येतील. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबर शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश कसा करता येईल यावर या पुढच्या काळात लक्ष देणार असून केळी हे या जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. त्यामुळे केळीवर प्रक्रिया करून बचत गटांच्या माध्यमातून केळीला बाजारपेठेत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये चांगले आणि गुणवत्तापूर्णवक शिक्षण देण्यावर भर राहील. त्यादृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देणे, शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही श्री.अंकित यांनी सांगितले.