
चाळीसगाव chalisgaon / प्रतिनिधी
मुंबईकडून कुशीनगर कडे धावणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसच्या (Kushinagar Express) जनरल डब्याला (General compartment) न्यायडोंगरी- पिंपरखेड रेल्वेस्थानका दरम्यान आज (दि.18) संकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक आग (fire) लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आग विझवत नियंत्रण मिळवले. चाळीसगाव स्थानकावर गाडीची पूर्ण तपासणी करून, गाडी पुढे भुसावळ कडे रवाना झाली.
डाऊन कुशीनगर एक्सप्रेस मधे इंजीन पासुन तिसऱ्या कोचमधे नायडोंगरी स्थानकाजवळ एका प्रवाशाच्या बॅगमधील स्फोटक वस्तूचा अचानकपणे स्फोट झाल्याने बॅगेसह सीट जळू लागले. यात दोन प्रवाशांच्या बॅॅगाही जळू लागल्या. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
सुदैवाने यात कुठल्याही प्रकराची जीवित हानी झाली नाही. प्रवाशांनी तत्परता दाखवत ही आग विझवली. गाडी चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आल्यावर रेल्वेच्या कर्मचार्यांनी या डब्यासह गाडीची पूर्ण तपासणी केली. ज्या डब्यात स्फोट झाला तो डबाही तपासला. तपासणी अंती कोणताही धोका नसल्याने गाडी पुढे मार्गस्थ करण्यात आली. आग लागल्यामुळे ट्रेन साधारणता 40/45 मिनिट लेट झाली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रवाशाच्या बॅगमध्ये कुठल्या प्रकारच्या वस्तुने पेट घेतला याचा पोलीस शोध घेत आहेत.