
गोराडखेडा, ता.पाचोरा (वार्ताहर) pachora
शिवारात पावसाची (rain) एकही सर अजून बरसली नसल्याने शेतकरी (Farmers) चिंतेत सापडले आहेत. कारण जून महिना अर्धा संपत आला आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी एक जूननंतर मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली आहे. त्यात साधारणत: पन्नास टक्क्यांपर्यंत मर निघत असून शेतकरी पुन्हा (Seeds) बियाणे आणून ती लावत आहे.
लवकरच वरुणराजाचे आगमन होईल, पावसाच्या सरी बरसतील व डौलदार पीक नजरेस पहावयास मिळेल या आशेने जवळचा पैसा खर्च करून शेतात परिश्रम घेत आहे. मात्र एक एक दिवस कोरडा निघत आहे. तसतसा शेतकरी अधिक चिंतेत सापडत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यात पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होईल तसेच यावर्षी समाधानकारक पर्जन्यमान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हा अंदाज पाहून शेतकरी समाधानला व मागील वर्षी पांढऱ्या सोन्यास ऐतिहासिक भाव मिळाला. त्याचप्रमाणे यावर्षीही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात परिसरात कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. पाण्याची व्यवस्था असणार्या बहुतांश शेतकर्यांनी लागवड केली आहे.
कोरडवाहू शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीपूर्व तयारी करून पावसाचे आगमन होताच पेरणी करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र लांबलेला पाऊस पाहून शेतकरीवर्ग चिंतेत सापडला. उगवत्या सूर्यासोबत आज तरी पावसाची हमखास हजरी राहील या अपेक्षेने एकेक दिवस ढकलला जात आहे. मात्र वरुणराजा शेतकऱ्यांचा अंत न पाहता लवकरच सर्वत्र पसरेल बरसेल.
पावसाच्या सरी सोबत शेतकऱ्यांच्या मनांची व तहानलेल्या काळ्या आईची तृप्ती करेल ही अपेक्षा व्यक्त करत ‘पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी-पाणी! शेत माझं लई तान्हीलं, चातका वाणी!’ अशा स्वरुपाची आर्त हाक जणू परमेश्वरास करत आहे.