
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात सुरु असलेला बनावट दारु निर्मितीचा कारखाना उध्वस्त करुन साडे तीन लाखाच्या दारुसह, स्पीरीट, मशिनरी व वाहने मिळून साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी ही कारवाई केली आहे.
पथकाकडून कारखान्याला घेराव घालून कारवाई
मन्यारखेडा शिवारात पार्टेशनच्या घरात दारु निर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील यांना मिळाली होती.
त्यानुसार निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील,आनंद पाटील, सागर पाटील, सहायक फौजदार डी.बी.पाटील, जवान अजय गावंडे, कुणाल सोनवणे, नितीन पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, राहूल सोनवणे व नंदू नन्नवरे यांच्या पथकाने दुपारी साध्या वेशात जावून कारखान्याला घेराव घातला. त्यामुळे एकालाही पलायन करण्यास संधी मिळाली नाही.
या पाच जणांना अटक
या कारवाईत मशीन, दारु, स्पीरीट, बाटल्या व इतर साहित्यासह चारचाकी आणि दुचाकी ताब्यात घेतली. या कारवाईत पथकाने दारु निर्मिती करताना आढळून आलेल्या गणेश भाऊराव कोळी (24, रा.शिरपूर), सुखदेव पूनमचंद पवार (30,रा.चिखली, ता.शहादा), गणेश हिरालाल सोनवणे (28,रा.अयोध्या नगर), सियाराम हरीराम पावरा (19,रा.शिव कॉलनी) व भाईदास शिवला पावरा (18,रा.धरबापाडा,मोराडी, ता.शिरपूर) पाचही अटक करण्यात आलेली आहे.