
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
विवाह ही मानवाच्या आयुष्यातील एक सुखद घटना असते. विवाहयोग्य वय होताच आईवडील आपल्या मुलामुलींचे विवाह लावून देतात. वंशवृध्दी आणि जीवनाचे जोडीदार म्हणून यासाठी विवाहसंस्कार होत असतात. असे विवाह होणे ही रूटीन मधील बाब आहे. मात्र जळगाव शहरात असा एक विवाह होत आहे की ज्याची चर्चा जोरात सुरू आहे. यातील उपवर व उपवधु यांची वये साठीत आहेत. अशा आजीआजोबांचा (grandparents) अनोखा विवाह (unique marriage) 3 मार्च रोजी होत आहे. कसा आहे हा अनोखा विवाह ते वाचाच...
धरणगाव येथील रहिवासी अॅड. हरिहर पाटील, (वय 60) यांच्या पत्नीचे डिसेंबर मध्ये निधन झाले. त्यांना दोन मुली असून त्यांची लग्न झाली आहे. अॅड. हरिहर स्वतः अंध आहे. त्यामुळे त्यांना पुढे आधाराची गरज होती. त्यासाठी त्यांनी जळगाव शहर महानगरपालिका , शहरी बेघर निवारा केंद्र येथे भेट दिली. निवारा केंद्रातील मीना चौधरी (वय 59) या केंद्रात 4 वर्षा पासुन राहत आहे. त्यांचे कोणीही नाही व त्या अविवाहित आहे.
बुधवारी धरणगाव येथे मनपा बेघर केंद्राचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती ची माहिती घेऊन दोघांचा विवाह करुन त्यांना एकमेकांचा आधार देऊ शकतो. या उद्देशाने दि 3 मार्च शुक्रवार रोजी 12 वाजता या आजी आजोबांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यास जळगाव शहर महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी देखील उपस्थिती देणार आहेत.