ईडीची ‘गाडी’ अन् फार्म हाऊसवर ‘कारवाई’

खडसेंच्या मालमत्ता जप्तीच्या अफवेला पूर्णविराम
ईडीची ‘गाडी’ अन् फार्म हाऊसवर ‘कारवाई’

जळगाव । (Jalgaon)

माजी मंत्री एकनाथराव खडसे (Former Minister Eknathrao Khadse) यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून ईडीचा ससेमीरा असला तरी त्यांनी न डगमगता त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरु ठेवलेला आहे. जावई ईडीच्या कोठडीत असताना व त्यांची चौकशी झालेली असताना पत्नी मंदाकिनी खडसे यांनादेखील ईडीने समन्स बजावले आहेत. असे असताना बुधवारी खडसेंच्या फार्म हाऊसवर कारवाई केल्याची वार्ता जिल्ह्यात पसरली. त्यामुळे दैनिकांचे फोन खणखायला प्रारंभ झाला.

मुक्ताईनगर (Muktainagar) येथील खडसेंचे फार्म हाऊस (Farm House) खरेच सील केले काय? ईडीची कारवाई झाली? नाथाभाऊंना ताब्यात घेतले काय? असे एक नव्हे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले .शेवटी खडसेंच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना सायंकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधून अशी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या केवळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यावेळी या अफवांवर पडदा पडला.

बुधवारचा दिवस उजाडला तोच मुळात अफवांची किनार घेऊन कुणीतरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसवर ईडीची नोटीस लावल्याची बातमी सोडली. त्याची चर्चा जळगाव शहरासह जिल्ह्यात पसरली. ईडीचे अधिकारी जळगावात दाखल झालेले असून त्यांनी जळगावातील व मुक्ताईनगरातील खडसेंचे फार्म हाऊस सील केल्याचे सांगण्यात आले. मात्र, याबाबत स्पष्टता येत असल्याने संभ्रम अधिकच वाढला. अखेर रोहिणीताई खडसे यांनी या वादावर पडदा टाकला.

खरे म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ‘ईडी’चा ससेमिरा लागला आहे. चौकशी झाल्यानंतरदेखील वारंवार त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आज दिवसभर या अफवांनी जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. मात्र अ‍ॅड.रोहिणीताई खडसे (Adv. Rohinitai Khadse) व स्वत: एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याने दिवसभर चाललेल्या या चर्चा केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले असले तरी ‘ईडी’ची वक्रदृष्टी अद्यापही त्यांच्यावर कायम आहे.

या केवळ अफवा - अ‍ॅड.खडसे

मुक्ताईनगर । एकनाथराव खडसे यांना बुधवारी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. याशिवाय फार्मवर जप्ती आली. यासह एक ना अनेक बाबींवर बुधवारी सकाळपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. मात्र, या बाबी निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. शिवाय कोणतीही जप्ती, कारवाई वा नोटीस आलेली नाही, अशी माहिती जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणीताई खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अ‍ॅड. खडसे म्हणाल्या की, खडसे हे खासगी कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे केवळ काही लोकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच जप्तीदेखील झालेली नाही.

‘विरोधकांकडून बदनामी’

विरोधकांकडून निव्वळ बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. अफवा पसरवून बदनामी करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही; त्यामुळे घाबरण्याचे काम नाही. न्याय व्यवस्थेवर आपला परिपूर्ण विश्वास आहे, असे एकनाथराव खडसे म्हणाले.

Related Stories

No stories found.