
जळगाव : jalgaon
सहकार पॅनलचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जळगाव केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँक निवडणुकीत दहा जागांसाठी मतदान होत आहे. हे मतदान मतदारांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या केंद्रांवर करावयाचे आहे.
त्यानुसार इतर सहकारी संस्था व व्यक्ती मतदार संघातून उमेदवारी करीत असलेले सरकार पॅनलचे नेते व माजी पालकमंत्री श्री देवकर यांनी जळगाव येथील सु. ग. देवकर विद्यालयात सकाळी मतदान केले.
मतदानानंतर बोलताना श्री देवकर म्हणाले, की सहकार पॅनलच्या सर्व जागा प्रचंड बहुमताने निवडून येतील, याचा आम्हाला विश्वास आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत आपल्या उमेदवारांनी मेळाव्यांद्वारे सहकार पॅनेलची भूमिका पोचवली आहे. त्यामुळे मतदारांचा सहकार पॅनलला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच सहकार पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येतील, याचा आम्हाला विश्वास आहे.