
भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी (Central railway GM Anil Kumar Lahoti) यांनी दि. २६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (csmt) येथे मध्य रेल्वेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात २०२१-२२ या वर्षात उत्कृष्ट आणि अनुकरणीय काम केल्याबद्दल १३६ अधिकारी आणि कर्मचार्यांना वार्षिक पुरस्कार आणि विभाग, कार्यशाळा, युनिट्स यांना २१ शिल्ड्स प्रदान केल्या. त्यांनी विभाग, कार्यशाळा, रेल्वे स्थानकांना आंतर-विभागीय कार्यक्षमता शील्ड प्रदान केल्या.
महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, अतिरिक्त महाव्यवस्थापक बी.के. दादाभाय, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी डॉ.ए.के.सिन्हा, विभागांचे प्रधान प्रमुख आणि शिल्ड विजेते विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यक्रमा दरम्यान मंचावर उपस्थित होते.
मुंबई आणि नागपूर विभागाला संयुक्तपणे एकूण कार्यक्षमता शील्ड जिंकली. वाणिज्यक, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि स्वच्छतेचा समावेश असलेल्या विभागीय कार्यक्षमतेसाठी मुंबई विभाग ४ शिल्डचा अभिमानास्पद विजेता ठरला.
मुंबई विभागाने सोलापूर विभागासह संयुक्तपणे अभियांत्रिकी, भुसावळ विभागासह संयुक्तपणे सिग्नल आणि दूरसंचार, पुणे विभागासह संयुक्तपणे कार्मिक शिल्ड आणि नागपूर विभागासह संयुक्तपणे संरक्षा शील्ड जिंकली. मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी संबंधित विभागाच्या संबंधित शाखा अधिकार्यांसह शिल्ड स्वीकारली.
भुसावळ विभागाने ट्रॅक मशीन शील्ड (Bhusawal division track machine shield) जिंकली.
सोलापूर विभागाने सेफ्टी, मेडिकल शिल्ड. पुणे विभागाने वक्तशीरपणा शिल्ड. नागपूर विभागाने अकाउंट्स आणि ऑपरेटिंग शिल्ड आणि माटुंगा वर्कशॉप, मुंबई यांनी कार्यशाळा कार्यक्षमता शील्ड जिंकली.
पुणे आणि भुसावळ विभागांनी संयुक्तपणे स्टोअर्स शिल्ड, भुसावळ आणि नागपूर विभागांनी संयुक्तपणे वर्क्स एफिशिएन्सी शिल्ड तर अहमदनगर आणि पुणे युनिट्सनी संयुक्तपणे उत्कृष्ट निर्माण युनिट शिल्ड जिंकले. मुंबई विभागातील मुलुंड स्थानकाला स्वच्छतेसाठी सी, डी आणि ई श्रेणीतील सर्वोत्कृष्ट स्थानकासाठी शिल्ड आणि भुसावळ विभागातील नाशिक रोड स्थानकाने स्वच्छतेसाठी (ए१, ए आणि बी श्रेणीतील स्टेशन) सर्वोत्तम स्थानकाचा पुरस्कार पटकावला. पुणे विभागातील उरुळी रेल्वे स्थानकाला सर्वोत्कृष्ट राखीव उद्यानाचा तर द्वितीय क्रमांकाच्या उत्कृष्ट उद्यानाचा पुरस्कार नागपूर विभागातील मुलताई स्थानकाला देण्यात आला.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी, संबोधित करताना कोरोना साथीच्या वर्षात मध्य रेल्वेने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच सर्व प्रधान विभाग प्रमुख आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत कर्मचारी वर्ग असल्याचा मला अभिमान आहे. कामगार संघटनांनी दिलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले.
यापूर्वी प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी डॉ.ए.के. सिन्हा यांनी स्वागत केले. प्रसंगी मध्य रेल्वेचे सर्व प्रधान विभागप्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर अधिकारी, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मीनू लाहोटी आणि कार्यकारी समिती सदस्या, मान्यताप्राप्त युनियन प्रतिनिधी उपस्थित होते. ऍवॉर्ड वितरणाआधी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. जनसंपर्क विभागातर्फे हा संपूर्ण कार्यक्रम यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.