शोध सामर्थ्याचा : खान्देशच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी धडपडणारे दीपक चांदोरकर

शोध सामर्थ्याचा : खान्देशच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी धडपडणारे दीपक चांदोरकर

प्रतिष्ठान देत असलेल्या कार्यक्रमाने कार्यक्रमांचा एक विशिष्ठ असा दर्जा निर्माण केला, त्यामुळे चांदोरकर प्रतिष्ठान चांगले कार्यक्रम रसिकांना देतात हा विश्वास जळगावकरांमध्ये आम्ही निर्माण केला. गेल्या 20 वर्षात 175 कार्यक्रम जळगावकरांना दिले, या माध्यमातून 900 वर मान्यवर कलावंतांनी जळगावला हजेरी लावली. स्व.वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर सांगत होते.

चांदोरकर हे मूळचे कोकणातले.चांदोर हे रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे गाव. दीपकरावांचे आजोबा गोविंद काशिनाथ चांदोरकर हे व्यवसायाने वकील व इतिहास संशोधक. व्यवसायानिमित्ताने धुळ्यास आले. धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंदिरात चांदोरकर, भट, देव ही त्रिमूर्ती प्रसिध्द होती. त्यांच्या निधनानंतर वसंतराव चांदोरकर जळगावला काकांकडे आले. भगीरथ स्कूलमध्ये नाव दाखल केले. वसंतरावांचा गोड गळा होता. एकदा शाळेत त्यांना वर्गात कविता वाचायला सांगितली, त्यावेळी ती त्यांनी सुरेल आवाजात म्हणून दाखवली.

याचवेळी शाळेचे मुख्याध्यापक वा.दा. पंडित राऊंडला आलेले असतांना सुरेल आवाजात गाणे म्हणणारा हा मुलगा त्यांच्या नजरेस पडला. त्याची चौकशी केली आणि वसंतरावांच्या काकांना बोलावून त्यास गाणे शिकवण्याचा सल्ला दिला. रं.ना.करकरे, भास्करबुवा बखले पासून अनेक गुरू या गायनाच्या वाटेवर मिळत गेले आणि वसंतरावांचे गायन बहरत गेले. 1949 मध्ये रेडिओच्या गाण्याच्या ऑडिशन्स दिल्या आणि ते रेडिओ आर्टीस्ट बनले. मुंबई वगळता रं. ना. करकरे आणि वसंतराव चांदोरकर हे दोघेच रेडिओ आर्टिस्ट होते.

नंतर पुणे, जळगाव ही आकाशवाणीची केंद्रे सुरू झाली आणि वसंतरावांचा आवाज या केंद्रावर देखील ऐकू येऊ लागला. जळगावला आपल्या शिष्यांना गायन शिकवतांना केवळ परीक्षा देऊन त्यांना पास करणे हे ध्येय वसंतरावांचे नव्हते तर परफॉर्मिंग आर्टीस्ट तो कसा होईल या अंगाने ते शिकवत असत.

2001 मध्ये वसंतराव चांदोरकरांचे निधन झाले आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कायमस्वरूपी काही करावे हा विचार त्यांच्या चाहत्यांमधून समोर आला. त्यातून 31 ऑक्टोबर 2001 ला स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानची स्थापना झाली. पदमजा फेणाणी यांच्या मंगलदीप हा गायनाचा प्रतिष्ठानच्या पहिला कार्यक्रमाला रसिकांनी ओसंडून वाहणारी गर्दी केली होती. त्यानंतर प्रतिष्ठानने मागे वळून पाहिलेच नाही, प्रतिष्ठानची धुरा वाहणारे दीपक चांदोरकर सांगत होते. दीपकरावांना देखील भक्कम शिक्षणाची पार्श्वभूमी आहे. ते एम.कॉम., एम.बी.ए. असून वडिलांबरोबर करत असलेल्या साथींमुळे उत्तम कानसेन बरोबरच हार्मोनियम, तबला, बासरी या वाद्यांवर प्रभुत्व मिळवले आहे.

पाडवा पहाट हा कार्यक्रम पूर्वी पुण्या मुंबईतच होत असे. या निमित्ताने पहाटेचे राग रसिकांना सहसा ऐकायला मिळत नसत, ते ऐकायला मिळावेत हा हेतू या मागे होता. असे असतांना हा उपक्रम जळगावात का होऊ नये या विचारातून 2002 मध्ये प्रतिष्ठानने पाडवा पहाट जळगावात सुरू केला. मंजिरी कर्वे या पहिल्या पाडवा पहाटच्या गायिका होत्या. गेले वीस वर्ष प्रतिष्ठानच्या वतीने पाडवा पहाट सातत्याने सुरू आहे. रेवा नातू, रघुनंदन पणशीकर, सुमेधा देसाई, मंजुषा पाटील कुलकर्णी, प्रल्हाद अडफळकर, उपेंद्र भट अशा अनेक कलावंतांनी यात हजेरी लावली आहे. हे करीत असतांना बालगंधर्वांच्या रंगभूमी सेवे बद्दल पुण्यापासून अनेक ठिकाणी नाटयगृहे उभारली गली आहेत.

पण संगीत सेवे बद्दल कुठेही काहीही नाही. बालगंधर्वांचे बालपण जळगावात गेले. असे असतांना त्यांच्या बद्दल कृतज्ञता म्हणून आपणच त्यांच्या नावे संगीत महोत्सव का सुरू करू नये हा विचार प्रतिष्ठानच्या समोर आला आणि 2003 मध्ये पहिला बालगंधर्व संगीत महोत्सव झाला. बालगंधर्वांच्या नावे संगीत महोत्सव करणारे जळगाव देशातील एकमेव शहर ठरले असल्याचे दीपक चांदोरकर सांगतात. 2003 मध्ये झालेल्या पहिल्याच संगीत महोत्सवात संजय अभ्यंकर, देवकी पंडित, विजय कोपरकर यांचे गायन, शाहीद परवेझ यांचे सतार वादन, ब्रिजनारायण मिश्रा यांचे सतार वादन, कावेरी आगाशे, मानसी तापीकर यांचे कथ्थक नृत्य सादर झाले.

या पहिल्या महोत्सवाला जळगावच नव्हे तर खान्देशातून भरभरून दाद मिळाली आणि संगीत महोत्सवा बाबत रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या. पाहता पाहता हा महोत्सव खान्देशचा सांस्कृतिक मानदंड बनला. आरती अंकलीकर -टिकेकर, वीणा सहस्त्रबुध्दे, पं.राम मराठे, किशोरी अमोणकर, सावनी शेंडे, मंजुषा कुलकर्णी, उस्ताद रशिदखान, आशा खाडीलकर, राहुल देशपांडे, शुभा मुदगल, पं. जसराज, राजन - साजन मिश्रा, पं.कलापिनी कोमकली, अजय चक्रवर्ती यांच्या गायनाच्या संगीत मैफिली रंगल्या, बिरजू महाराज, सुचेता भिडे चापेकर, तेजस्विनी लेले, अर्चना जोगळेकर यांचे नृत्य, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा, रेणु मुझुमदार, विश्वमोहन भट, सुरेश तळवलकर यांचे वादन रंगले.

विख्यात कलावंतांना या महोत्सवात आमंत्रित करत असतांना नव्या पिढीच्या कलावंतांना महोत्सवात संधी मिळाली पाहिजे ही सूचना पुढे आली, याची दखल घेत पूजा गायतोंडे, अंजली आणि नंदिनी गायकवाड, आनंद भाटे यांचे गायन, अर्शदखान यांचे इसराजवादन, प्रकृती आणि संस्कृती वहाने भगिनींचे सतार आणि संतूर वादन सादर झाले तर मोहम्मद अमान अनिरूध्द जोशी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, रोहित मिश्रा, राहुल मिश्रा यांचे ठुमरी दादराव टप्पा उपशास्त्रीय गायन, पं. दीपक महाराज यांचे कथ्थक नृत्य, गजानन साळुंखे यांचे सनई वादन, जपानचे ताका हिरो अराई यांचे संतूर वादनाने रसिकांना खिळवून ठेवले होते. आज नाव नाही पण प्रॉमिसिंग आर्टीस्ट आहे अशा युवकांना प्राधान्य दिले जात आहे.

पाडवा पहाट, बालगंधर्व महोत्सवाचा गोडवा पाडवा पहाट हा कार्यक्रम पूर्वी पुण्या मुंबईतच होत असे. हा उपक्रम जळगावात का होऊ नये या विचारातून 2002 मध्ये प्रतिष्ठानने पाडवा पहाट जळगावात सुरू केला. गेले वीस वर्ष पाडवा पहाट सुरू आहे. बालगंधर्वांच्या संगीत सेवे बद्दल कुठेही काहीही नाही. बालगंधर्वांचे बालपण जळगावात गेले. असे असतांना त्यांच्या बद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावे संगीत महोत्सव का सुरू करू नये हा विचार प्रतिष्ठानच्या समोर आला आणि 2003 मध्ये पहिला बालगंधर्व संगीत महोत्सव झाला. बालगंधर्वांच्या नावे संगीत महोत्सव करणारे जळगाव देशातील एकमेव शहर ठरले असल्याचे दीपक चांदोरकर सांगतात.

हा महोत्सव होत असतांना 2009 मध्ये प्रतिष्ठानने सारेगमप लिटील चॅम्प या त्यावेळी गाजलेल्या कार्यक्रमाचे कलाकार प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत या बाल कलाकारांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. खान्देश मीलमध्ये हा कार्यक्रम झाला. प्रवेशासाठी एक किमी लांब रांग, तब्ब्ल 20 हजार रसिकांनी हजेरी लावत या कार्यक्रमाने इतिहास घडवला. या शिवाय चांदोरकर प्रतिष्ठानने एनसीपीए, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, गोवा कला अकादमी बरोबर कार्यक्रमांचे टायअप केले आहे.

दक्षिण मध्य, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चांगले कलावंत कार्यक्रमासाठी त्यांचे माध्यमातून उपलब्ध होत आहेत.क्षमा भाटे यांचे कथ्थकवर वर्कशॉप, अरूण कशाळकर यांचे बंदिशीवर वर्कशॉप सारखे उपक्रम देखील जळगावच्या युवक कलावंतांसाठी घेत जळगाव प्रती सामाजिक बांधीलकी जपली. दरवर्षी महोत्सवात जाणवलेल्या चुका दुरूस्त करत गेलो.

उत्तम व्यवस्थापन, सहकार्यास तरूणाईची टीम यामुळे कार्यक्रम यशस्वी होत गेले. पूर्वी महोत्सवाची तिकीटे विकावी लागत आज पुढील महोत्सवासाठी अर्धे थिएटर आजच बुक आहे.

चांगले काय ऐकावे याची जळगावकरांना आता सवय लागली आहे. शास्त्रीय संगीत आवडू लागले आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी तरूण पिढी येऊ लागली आहे, हे महोत्सवाचे मोठे यश असल्याचे चांदोरकर सांगतात. दिपीका चांदोरकर, वरूण देशपांडे, अरविंद देशपांडे यांचे मिळणारे सहकार्य तितकेच मोलाचे असल्याचे दीपक चांदोरकर सांगतात.

- संपर्क -

मो. 94227 74911

Email : sangeetnritya@gmail.com

Website : www.chandorkarpratishthan.com

Youtube : Chandorkar Pratishthan

Facebook : facebook.com/ChandorkarP

twitter.com/ChandorkarP

Instagram : chandorkarpratishthan

Related Stories

No stories found.